मतदानोत्तर चाचण्या आणि अंदाज ज्या प्रमाणे व्यक्त झाले होते. त्याचप्रमाणे बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी व तमिळनाडू येथील निकाल मतमोजणी होऊन जाहीर झाले आहेत. आसाम, केरळ व बंगालमध्ये विद्यमान सरकार सत्तारुढ झाले आहे. तर पुद्दुचेरीमध्ये भाजपाची सरशी झाली आहे. तमिळनाडूत बदल झाला आहे. पण लढत स्थानिक, प्रादेशिक पक्षांचीच होती. तेथे डीएमकेचे सत्ताग्रहण निश्चित झाले आहे. या निवडणुकीत भाजपाचे यश उल्लेखनीय असले तरी परिणामकारक ठरलेले नाही. त्यामुळे भक्त नाराज आणि विरोधक नाचत असले तरी भारताच्या राजकारणातील प्रादेशिक पक्षांचे महत्त्व पुन्हा अधोरेखीत झाले आहे. काँग्रेस पक्ष हळूहळू शक्तीहीन होत असताना प्रादेशिक पक्षांचा वाढत असलेला प्रभाव आणि ममता बॅनर्जी यांनी एकाकी झुंज देत भाजपाला चारलेली धूळ यांची नोंद घ्यावीच लागेल. ममतांच्या विजयाचे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, संजय राऊत वगैरे स्वागत करत असले तरी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव झाला आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही मोठी ताकद लावली होती. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तळ ठोकून होते. गल्ली बोळात प्रचार सुरू होता. आपण सत्तारुढ आहोत आणि भारत भालकेंच्या निधनाची सहानुभूती आहे. सहज जिंकू असे त्यांना वाटत होते. जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करण्यात तरबेज आहेत. पंढरपूरमध्ये त्यांनी सूतोवाच केले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनीच करेक्ट कार्यक्रम केला व महाआघाडीला धूळ चारली. मतमोजणीत प्रारंभी चुरशीची वाटलेली पंढरपूरची निवडणूक भाजपाचे समाधान औताडे यांनी चांगल्या मताधिक्याने जिंकली आहे. महाआघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तीपणाला लावूनही भाजपाने एकजुटीने आणि स्थानिक मुद्यांना महत्त्व देत ती जिंकली. भारत भालके यांच्या निधनाची जशी सहानभुती भगिरथ यांना होती तसे प्रशांत परिचारक यांची पुण्याई व भाजपाचे सामुदायिक प्रयत्न समाधान आवताडे यांच्या विजयाला कारणीभूत ठरले. अलीकडे झालेल्या पदवीधरच्या निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका यामध्ये भाजपाला यश मिळाले नव्हते. या पार्श्वभूमीवर भाजपाने पंढरपूरची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांचेवर सोपवली व देवेंद्र फडणवीस यांनी आवताडे, परिचारक, मोहिते पाटील व खा. रणजितसिंह नाईक यांची उत्तम मोट बांधली व मतदारसंघ ढवळून काढत पाण्याचा मुद्दा मध्यवर्ती करत विजय खेचून आणला. पंढरपूरच्या या विजयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर लगेच परिणाम होईल, असे नाही पण भाजपाचा आत्मविश्वास वाढेल आणि वसुली व लफडी यामुळे कचाटय़ात आलेल्या आघाडी सरकारचे मनोधैर्य थोडेफार ढळेल असे म्हणायला हरकत नाही. पण राजकारणात सारे सत्तेला चटावलेले असतात. कोणत्याही गोष्टी फारशा मनाला लाऊन न घेता त्यांचा कार्यक्रम सुरु असतो. आसाममध्ये अपक्षेप्रमाणे भाजप व एनडीएची सरशी झाली आहे. भाजपाने आसामात सत्ता राखली आहे. तेथे युपीएने विरोधी पक्ष म्हणून बरे संख्याबळ मिळवले आहे. केरळमध्ये 140 जागा होत्या. तेथे डावे सुसाट यश मिळवताना दिसले. एलडीएफ सरकार तेथे सत्तारुढ होणार हे स्पष्ट झाले आहे. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत युडीएफ आणि माकपप्रणीत एलडीएफ असा सामना होता. भाजपाचे तेथे फारसे अस्तित्व नव्हते पण भाजपाने खाते खोलले आहे. पुद्दुचेरीत भाजपाने यश मिळवले आहे. अतिशय छोटे असे हे राज्य आहे. पण भाजपाने तेथे आपल्या सर्व कसरती करत झेंडा फडकवला आहे. बेळगाव लोकसभाची जागा भाजपने आपल्याकडेच राखली असली तरी म.ए. समितीचे शुभम शेळके यांनी मिळवलेली मते उल्लेखनीय आणि उत्साहवर्धक आहेत. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष बंगालकडे अधिक लागले होते भाजपा व मोदी-शहांनी तेथे सारी शक्तीपणाला लावली होती. त्यांची आमदार संख्या 3 वरुन 80 पर्यंत वाढली पण भाजपाला अपेक्षित विजय मिळाला नाही. ममता बॅनर्जी यांनी तेथे 200 पेक्षा जास्त जागा मिळवत आपणच बंगालची वाघीण आहोत हे दाखवून दिले. भाजपाची अलीकडची निवडणूक लढवण्याची कार्यशैली आर या पार अशीच राहिली आहे. काही वेळा त्याचा फायदा होत असला तरी काही वेळा तोटा होतो. बंगालमध्ये जातीय समीकरणेही चालली नाहीत व महिलांची सहानुभूती ममतादीदीच्या पाठीशी राहिली असे सर्वसाधारण दिसते आहे. सगळीकडचे निवडणुकीचे निकाल फारसे धक्कादायक नाहीत. पण सर्वच पक्षांना चिंतन करायला लावणारे आहेत. यातून राष्ट्रीय राजकारणात नवी समीकरणे उदयाला येतील हे वेगळे सांगायला नको. पूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, मेहबुबा मुक्ती आदींनी ममतांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. काँग्रेस नेतेही यात मागे नाहीत. वैयक्तिक ममतादीदी पराभूत झाल्या आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांना एकत्र आणून शरद पवारांनी भाजपाला रोखले होते. आता ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता मिळवत भाजपाला धूळ चारली आहे. ‘शत प्रतिशत भाजपा’ साठी भाजपाला अधिक चांगले काम व व्यापक समर्थन मिळवणे गरजेचे आहे. केवळ मोदी, शहा, नड्डा याबरोबरच स्थानिक व प्रादेशिक नेत्यांना बळ व आवाज देणे गरजेचे आहे. या निकालांचा तपशिलाने अर्थ शोधला जाईल. मतांची आकडेवारी व विश्लेषण होईल. चिंतन शिबिरे होतील. पण खऱया अर्थाने सब का साथ, सब का विकास झाला पाहिजे. तोच निवडणुकीचा अर्थ आहे.
निवडणूक निकालाचा अर्थ शोधत असताना कोरोना वाढतो आहे. मोठी लाट व लॉकडाऊन यासाठी तज्ञ सांगत आहेत. राजकारण बाजूला ठेऊन कोरोनावर मात करण्यासाठी पक्षभेद बाजूला ठेऊन एकजूट केली पाहिजे.








