उमेदवारांना ऑटो रिक्षा, घागर, टेलिफोन अशा विविध चिन्हांचे वाटप
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारी दुपारपर्यंतची वेळ देण्यात आली होती. दुपारनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. विशेषतः अपक्ष उमेदवारांना ऑटो रिक्षा, घागर, टेलिफोन, टीव्ही, बॅट अशी विविध चिन्हे मिळाली आहेत. त्यानंतर लागलीच उमेदवारांनी आपल्या वॉर्डमध्ये फेरफटका मारून प्रचाराला सुरूवात केली.
महापालिकेच्या 58 वॉर्डांकरिता निवडणुकीत 468 उमेदवारी अर्ज होते. गुरुवारी दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. निवडणुकीच्या रिंगणात 385 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले असून, निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची चिन्हे असतात त्यामुळे अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आलो. ऑटो रिक्षा, घागर, टेलिफोन, मोबाईल, बॅट, चेंडू, कार अशी विविध चिन्हे देण्यात आली. दुपारी चिन्हांचे वाटप करण्यात आल्यानंतर लागलीच उमेदवारांनी आपल्या वॉर्डमधील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला. यावेळी कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. प्रचारासाठी जाताना केवळ चार जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यासाठी गुरुवारी संध्याकाळपासून प्रारंभ केला. उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळताच प्रचाराचा नारळ फोडला आहे.









