विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱयांची बैठक : प्रत्येक चार वॉर्डला एक निवडणूक अधिकारी-साहाय्यक अधिकाऱयांची नियुक्ती यादी तयार
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका निवडणुकीची अचानकपणे घोषणा करण्यात आल्याने महापालिकेच्या अधिकाऱयांची धावपळ उडाली आहे. निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती तसेच मतदान केंद्रांची चाचपणी याबाबत कोणतीच तयारी नसल्याने गुरुवारी सकाळपासून अधिकाऱयांनी कंबर कसली. विविध विभागाच्या अधिकाऱयांना व कर्मचाऱयांची बैठक घेऊन विविध जबाबदाऱया सोपविण्यात आल्या.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत होणार नाहीत, अशी घोषणा राज्य शासनाने केली होती. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी निर्धास्तपणे होते. तसेच जुलैअखेर महापालिकेची वॉर्डनिहाय मतदारयादी तयार करण्यात आली होती. प्रत्येक चार वॉर्डला एक निवडणूक अधिकारी आणि साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने मनपा प्रशासनाला केली. त्यामुळे अधिकाऱयांची यादी तयार करून पुढील कार्यवाहीसाठी हालचाली सुरू होत्या. मात्र याचदरम्यान महापालिका आयुक्त जगदीश के. एच हे रजेवर गेल्याने कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती व मतदान केंद्रांची चाचपणी असे सर्वच कामकाज ठप्प झाले आहे.
अशातच बुधवारी अचानकपणे महापालिका निवडणुकीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने जारी केली आहे. कोणतीच तयारी नसताना निवडणूक जाहीर झाल्याने मनपा अधिकाऱयांची भंबेरी उडाली आहे. अधिकृत आदेश मिळताच सर्व तयारी करण्यासाठी महापालिका कार्यालयात गुरुवारी सकाळपासूनच धावपळ सुरू झाली. प्रत्येक चार वॉर्डला एक निवडणूक अधिकारी व साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांची निवड करून यादी तयार करण्यात आली. तसेच संबंधित अधिकाऱयांना संपर्क साधून निवडणूक कामासाठी तयार राहण्याची सूचना करण्यात आली. पण काही अधिकाऱयांनी विविध कारणे देऊन निवडणुकीचे काम करण्यास सक्षम नसल्याचे सांगितले. त्यामुळे दुसऱया अधिकाऱयांचा शोध घेण्यात आला. तसेच मतदान केंद्रांची चाचपणी करून अहवाल देण्याची सूचना महसूल विभागातील अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना करण्यात आली.









