ऑनलाईन टीम / पणजी
पणजी येथील गोवा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या भारतीय निवडणूक आयोगाच्या ‘भरारी पथकाने केलेल्या त्या कृत्याचा गोवा ‘टीएमसी’ने निषेध व्यक्त केला आहे. गोवा ‘टीएमसी’ विभागाच्या अध्यक्षा अविता बांदोडकर आणि उपाध्यक्षा प्रतिभा बोरकर आणि गोवा ‘टीएमसी’चे सरचिटणीस ट्राजानो डी’मेलो यांनी आज पत्रकार परिषदेत यावर भाष्य केले.
शुक्रवार दि. 2१ जानेवारी २०२२ रात्री दोन पोलिस अधिकार्यांसह इतर अनेकांनी स्वतःला भारतीय निवडणूक आयोगाच्या ‘भरारी पथका’चे सदस्य म्हणून ओळख दाखवून गोवा ‘टीएमसी’ पक्ष कार्यालयाची तोडफोड केली. आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या देऊनही,‘भरारी पथका’च्या सदस्यांनी कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन न करणारे आणि केवळ साठवणुकीसाठी असलेले फलक जबरदस्तीने काढून टाकले.‘भरारी पथका’च्या सदस्यांना कर्मचाऱ्यांनी वारंवार केलेली विंनती आणि आश्वासनांकडे लक्ष दिले नाही आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने धमकावणे, त्रास देणे आणि रोखणे चालू ठेवले. या घटनेनंतर गोवा ‘टीएमसी’ पक्ष कार्यालयाच्या मालमत्तेची तोडफोडही करण्यात आली.
भारतीय निवडणूक आयोगाच्या अतिरेकावर बोलताना, गोवा टीएमसीचे सरचिटणीस ट्राजानो डी’मेलो यांनी निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते म्हणाले, ‘आमच्याकडे साइन बोर्डसाठी परवानगी होती का, हे विचारण्यासाठी मध्यरात्री येऊन काही अर्थ आहे का ? गोव्यासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम करणाऱ्या ‘टीएमसी’ कार्यकर्त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात.’’
गोवा ‘टीएमसी’ महिला विभागाच्या अध्यक्षा प्रतिभा बोरकर यांनी आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, ‘टीएमसीला अशा छळाचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
ममता बॅनर्जी गोव्याच्या दौऱ्यावर आल्याच्या एक दिवस आधी ,त्यांच्या पोस्टर्सची तोडफोड करण्यात आली होती पण निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करण्यात अपयशी ठरला होता.भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘गोवा ‘टीएमसी’ अशा कृत्यांमुळे खचून जाणार नाही आणि भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार निवडणूक लढवेल. त्यामुळे या कृत्याची योग्य ती चौकशी करत संबधीत घटकावर योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे.