नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
आसाममध्ये काल, गुरूवार रोजी (1 एप्रिल ) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र मतदान पार पडल्यानंतर भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडले. यावरून राजकीच वातावरण चांगलेच तापले आहे. या घडलेल्या प्रकारावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले. मात्र निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणावर टीका होत आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी- वधेरा यांनी देखील निवडणूक आयोगावर “क्या स्क्रिप्ट है?, असे म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
प्रियांका गांधी- वधेरा यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. त्याचवेळी तिथे एक गाडी प्रकट झाली. योगायोगाने ती गाडी भाजप उमेदवाराची निघाली. निष्पाप निवडणूक आयोगाने याच गाडीतून प्रवास केला. प्रिय निवडणूक आयोग, हे प्रकरण नेमके आहे तरी काय? यावर तुम्ही देशाला स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या या निष्पक्षतेला रामराम म्हणायचं का?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणावर उपस्थित केला आहे.
आसाम विधानसभेच्या पाथरकांडी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपचे उमेदवार कृष्णेंदू पाल यांच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर निवडणूक आयोगावर टीका होत आहे. निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, ही गाडी भाजप उमेदवाराची आहे, हे आमच्या नंतर लक्षात आले.