पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या सैनिकांना घेराव घाला, असे आदेशवजा वक्तव्य तृणमूल काँगेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून केले आहे. यामुळे निवडणूक आयोग संतप्त झाला असून त्याने बॅनर्जींना खरमरीत पत्र पाठविले असून प्रक्षोभक विधाने केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून केंद्रीय राखीव पोलिस दलाचे कार्य सुरू असताना त्यांच्या कार्यात अडथळा आणण्याचे आवाहन करणे आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे बॅनर्जींना बजावण्यात आले.
चौथ्या टप्प्याचे मतदान होण्यापूर्वी बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. भाजपनेही यासाठी त्यांच्यावर कठोर टीका केली असून पराभवाच्या भीतीने त्यांना सतावले असल्याने त्या अशी भाषा करतात. त्या नैराश्याने ग्रासलेल्या आहेत, असे आरोप भाजपने केले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये जसजशी निवडणूक रंगात येत आहे, तशा तृणमूल काँगेस नेत्या ममता बॅनर्जी अधिकाधिक सैरभैर झाल्याचे पहावयास मिळत आहे. वास्तविक अद्याप निवडणूक कोणाच्या बाजूने फिरणार हे स्पष्ट झालेले नाही. कारण 294 मतदारसंघांपैकी केवळ 91 मतदारसंघांमध्ये मतदान झाले असून आणखी 203 मतदारसंघांमध्ये ते व्हायचे आहे. तथापि, बँकर्जींच्या देहबोलीवरून आणि निवडणूक प्रचारात त्या जी भाषा उपयोगात आणत आहेत, त्यावरून त्या तणावात असल्याचे दिसून येते, असे अनेक तज्ञांचे मत आहे. त्यातच त्यांचे आता केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबरच शब्दयुद्ध सुरू झाल्याने गोंधळात भरच पडली आहे.
निवडणूक आयोगाने बाहेरच्या राज्यांमधील सुरक्षा सैनिक मोठय़ा प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये मतदान व्यवस्थेसाठी आणले आहेत. कारण या राज्याला निवडणूक हिंसाचाराचा इतिहास आहे. गेल्या चार विधानसभा निवडणुका येथे केंद्रीय राखील पोलिस दलांच्या देखरेखीतच पार पडल्या आहेत. तथापि, यावेळी मात्र ममता बॅनर्जींनी या दलांना विरोध केला आहे. बाहेरचे पोलिस आपल्या मतदारांना मते देऊ देत नाहीत. ते भाजपच्या बाजूचे आहेत, असा त्यांचा आरोप असून त्यांनी अनेक प्रक्षोभक विधाने करण्यास प्रारंभ केला आहे.









