नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडे यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी ते उत्तर प्रदेशमध्ये मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या सेवानिवृत्तीमुळे आता अनुप चंद्र पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाल फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. पांडे यांच्या नियुक्तीमुळे आता तीन सदस्यीय कमिशन पूर्ण क्षमतेचे बनले आहे. सध्या सुशील चंद्र हे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) असून राजीव कुमार यांचाही त्यांच्या पॅनेलमध्ये समावेश आहे.
आगामी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमधील महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणुका त्यांच्या देखरेखीखाली होतील. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तत्पूर्वी योगींच्या विश्वासातील अधिकारी मुख्य निवडणूकपदी नेमल्याने मोठी चर्चा रंगली आहे. तसेच 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी उत्तर प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे.









