तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
वैराग ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायतीत होणार अशी चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भरणे यांना यासंदर्भात विचारले असता ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच वैराग नगर पंचायत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयन्त करणार असल्याचे ना. भरणे यांनी सांगितले. ना. भरणे हे सोलापूरवरून बार्शीकडे जात असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निरंजन भूमकर यांच्या निवासस्थानी भेटीसाठी थांबले होते. याप्रसंगी त्यांनी ‘तरूण भारत’ प्रतिनिधीशी संवाद साधला.
ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजण्याच्या तयारीत असताना वैरागकरांनीही ग्रामपंचायत निवडणूक कधी होणार याचे वेध लागले आहेत. यातच महाराष्ट्र शासनाच्या वतीने वैराग नगरपंचायत करण्याच्या संदर्भात २ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन विभागाला पत्र देण्यात आले आहे. या पत्राबाबत ना. भरणे यांना विचारले असता ते म्हणाले की, नगरपंचायत होणे हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने चांगलेच आहे. याबाबत शासन दरबारी सर्वतोपरी प्रयन्त करणार असून ग्रामपंचायत निवडणूकीपूर्वी वैराग नगरपंचायत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून वैराग ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायतमध्ये करावे असा प्रस्ताव सात फेब्रुवारी २०२० रोजी शासनास प्राप्त झाला आहे. त्या प्रस्तावाचे अवलोकन केले असता प्रस्तावासोबत अनुसूची-अ मध्ये प्रस्तावित नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करावयाच्या क्षेत्र C सर्वे क्रमांकांची यादी) व अनुसूचि- ब (संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील) याबाबत सविस्तर माहिती शासनास तात्काळ सादर करण्यात यावेत असा आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने २ डिसेंबर रोजीच्या पत्रानुसार सोलापूर जिल्हा प्रशासन विभागास केला होता. त्यानुसार सर्व सविस्तर माहिती शासनाला पोहोच केली आहे, त्यामुळे वैरागकरांच्या नगरपंचायतबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत.









