बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात विधानसभेच्या २ आणि विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, यावेळी विविध प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रचारकांना मर्यादित संख्येत प्रचारासाठी परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांच्या संख्येत घट केलेली आहे. दरम्यान मान्यताप्राप्त राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांची संख्या ४० वरून ३० करण्यात आली आहे. नोंदणीकृत प्रादेशिक पक्षांच्या स्टार प्रचारकांची संख्या २० वरून १५ करण्यात आली आहे.
हा आदेश राज्यातील दोन विधानसभा आणि विधानपरिषदेच्या ४ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी लागू असेल. तसेच निवडणूक प्रचारादरम्यान घेण्यात येणाऱ्या जाहीर सभांमध्ये केवळ मर्यादित लोक सहभागी होऊ शकतील. अशा कार्यक्रमांमध्ये मास्क घालणे आणि सामाजिक अंतर ठेवणे अनिवार्य असेल. निवडणूक आयोगाच्या या निर्देशांमुळे राजकीय पक्षांना यापुढे निवडणूक प्रचारादरम्यान शेकडो लोकांच्या निवडणूक प्रचार सभा घेणे शक्य होणार नाही.









