गिरदोली येथील सभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे आवाहन : गोमंतकीयांनी भाजपाची सत्ता पुन्हा स्थापित करावी
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
काँग्रेस पक्ष योग्यता, लोकशाही, परिश्रम, लोकमान्यता, त्याग व कष्ट यांच्यापेक्षा राजेशाहीला मान्यता देतो. गोमंतकीय जर वरील गुणांना प्राधान्य देत असेल, तर त्यांना आधी राजेशाहीला ठोकरावे लागेल. गोमंतकीयांच्या समोर भाजप हाच पर्याय असून तमाम गोमंतकीयांनी भाजपाची सत्ता पुन्हा एकदा स्थापित करून घराणेशाही व राजेशाहीला तडीपार करावे आणि आपली लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी कुंकळळी मतदारसंघातील गिरदोली येथे भाजपाच्या प्रचारसभेत बोलताना केले.
यावेळी कुंकळळीचे आमदार व भाजपाचे उमेदवार क्लाफास डायस, महाराष्ट्राचे आमदार योगेश सागर, कर्नाटकातील भाजप नेते राजू, मंडळ अध्यक्ष मारूती देसाई, गिरदोली जिल्हा पंचायत सदस्य संजना वेळीप, सरपंच जेनेटिक कार्दोज, माकाझन सरपंच कायतान वाझ, उपसरपंच ब्रायन, गुडी-पारोडा सरपंच शांती फर्नांडिस, बाळळी सरपंच राजू गोसावी, उपसरपंच वंदना गावकर, पंच दिपाली फळदेसाई, विष्णुदास नाईक, गोवा राज्य भाजप समिती सदस्या अलका पोतदार, आंबावली सरपंच जासिंता डायस, उपसरपंच रोहिदास देईकर, कुंकळ्ळीचे नगरसेविका पोलिता कारनेरो, रूपा गावकर, विशाल देसाई व इतर कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. स्मृती इराणी यांनी यावेळी भाजपाने गोव्यात व केंद्रात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. भारतीय जनता पक्ष राज्याच्या विकासासाठी आणखी एक संधी मागत असून जनतेच्या आशा-आकांक्षांना बळ देण्याचे कार्य करण्यास भाजप कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
कोविड काळाचा भाजपकडून यशस्वीरीत्या सामना
भाजपाने विविध योजना राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात पोहोचवून एक नवी क्रांती केली आहे. केंद्राच्या ‘हर घर मे नल’ योजनेच्या अंतर्गत गोव्यात भाजप सरकारने 2 लाख 7 हजार लोकांना नळ जोडण्या दिल्या आहेत. 1 लाख 30 हजार शौचालये उभारलेली आहेत, तर 1 हजार 600 विपेत्यांना खास योजनेच्या अंतर्गत अडीच कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. कोविड काळात राज्य सरकारने 19 महिन्यांत 1 लाख 40 हजार कुटुंबांना मोफत रेशन वाटले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ज्या वेळी देश संकटात होता तेव्हा काँग्रेसचे नेते सुट्टीवर होते व लसीवर शंका उपस्थित करत होते, अशी टीका इराणी यांनी केली. कोविडच्या संकटकाळात काँग्रेसचे नेते गायब होते. भाजप सरकारने व भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोविड काळात यशस्वी लढा दिला. ज्या देशात काँग्रेसची सत्ता असताना एकही पीपीई कीट तयार होत नव्हते तो देश आज कोविडसंदर्भात वापरण्यात येणाऱया पीपीई कीट्सच्या निर्यातीत दुसऱया क्रमांकावर असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.
…तर जनता काँग्रेसवर विश्वास कशी ठेवणार ?
काँग्रेस पक्षाला लाज-लज्जा यांची माहिती नसून या पक्षाचे नेते गोव्यात येऊन आपल्याच उमेदवारांना पक्ष सोडणार नसल्याची शपथ घ्यायला लावून प्रतिज्ञापत्र सादर करायला लावतात. ज्या पक्षाच्या नेत्यांना स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर व उमेदवारांवर विश्वास नाही त्या पक्षावर जनता कसा विश्वास ठेवणार, असा प्रश्न इराणी यांनी केला.
भाजपात गेल्याने विकास करता आला
आमदार डायस यांनी यावेळी बोलताना आपल्याला सेवा करण्यासाठी आणखी एक संधी देण्याचे आवाहान केले. आपण काँग्रेसमध्ये राहिलो असतो, तर मतदारसंघ उपेक्षित राहिला असता. आपण भाजपात प्रवेश केल्यामुळेच मतदारसंघाचा विकास साधणे शक्मय झाले. अडीच वर्षांत आपण 100 कोटी रुपयांची विकासकामे केली असून गेल्या निवडणुकीत आपल्यासोबत असलेले 90 टक्के ख्रिस्ती व मुस्लिम मतदार यावेळीही आपल्याबरोबर असून भाजपची पारंपरिक मते व आपले जुने मतदार यांच्या पाठिंब्यावर आपण निवडणूक सहज जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
यंदाच्या निवडणुकीत भाजपाला कुंकळळीत हिंदू मतदारांबरोबर ख्रिस्ती व मुस्लिम मतदारही मतदान करून नवा इतिहास रचतील, असा विश्वास डायस यांनी व्यक्त केला. यंदाच्या निवडणुकीत भाजपाला कुंकळळीत हिंदू मतदारांबरोबर ख्रिस्ती व मुस्लिम मतदारही मतदान करून नवा इतिहास घडवतील एवढा विश्वास डायस यांना आहे. यावरून त्यांचा प्रभाव दिसून येतो. डायस निश्चित विजय मिळवतील. त्यांनी मतदारांचा चांगला विश्वास कमावला असून त्यानुसार त्यांना तसाच प्रतिसाद मिळत आहे आपणास मतदारसंघात हे चित्र पाहायला मिळत असून ही मोठी जमेची बाजू आहे, असे मत कुंकळ्ळी मतदारसंघाचे प्रभारी योगेश सागर यांनी व्यक्त केले. मारूती देसाई यांनीही डायस यांच्यामागे मतदार पूर्णपणे असून यंदा कुंकळ्ळीत ते नवा विक्रम नोंदवतील, असा विश्वास व्यक्त केला. रामनाथ खरंगटे व इतरांनीही डायस विजयी होतील, असा दावा केला. मंडळ सचिव संदीप हरमलकर यांनी स्वागत केले व आभार मानले.









