बेळगाव / प्रतिनिधी
राष्ट्रीय पक्ष प्रथमच महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असून महापालिकेत राष्ट्रीय पक्षाच्या राजकारणाचा उदय झाला आहे. तसेच पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱया एमआयएमने देखील निवडणूक लढवून आपले खाते खोलले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असल्याने विविध पक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते. भाजप, काँग्रेस, जेडीएस यांच्यासह एमआयएम आणि आपनेही निवडणूक लढविली. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस यांचे उमेदवार निवडून आले आहेत. तसेच एमआयएमलादेखील 6 जागांपैकी एका जागेवर संधी मिळाली आहे. मनपाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 28 उमेदवार उभे केले होते. पण एकही उमेदवार निवडून आला नाही.
मतमोजणी केंद्राबाहेरील स्पीकर बंद
मतमोजणी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहने बाहेर लावण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच अंबाभुवनजवळील पोस्टमन चौकात आणि कॅन्टोन्मेंट कार्यालयाजवळ बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी थांबून निकाल ऐकावा लागत होता. निकाल जाहीर करण्यासाठी स्पीकरची व्यवस्था केली होती. मात्र मतमोजणी प्रक्रिया सुरू असतानाच स्पीकर बंद पडल्याने निकालाची माहिती उपलब्ध झाली नाही. उमेदवार बाहेर आल्यानंतरच कोणाचा विजय झाला, हे समजत होते. निकाल ऐकण्यासाठी थांबलेल्या कार्यकर्त्यांची निराशा झाली.
मीडिया रूम केवळ नाममात्र
मतमोजणीच्या ठिकाणी निकालाची माहिती देण्यासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी मीडिया रूम करण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी कोणतीच माहिती जाहीर करण्यात आली नाही. मीडिया रूममध्ये निकालाबाबतची माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे निकालाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. माध्यम प्रतिनिधींना मतमोजणीच्या कक्षामध्ये दाखल होऊन माहिती घ्यावी लागली. काही मतमोजणीच्या ठिकाणी जाण्यास पोलीस मज्जाव करीत होते.









