पन्हाळा / प्रतिनिधी
धबधबेवाडी ता.पन्हाळा येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वादातून दोन गटांत वाद झाला. यावेळी झालेल्या दंगलीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. तर दोन्ही पार्टीच्या दहा जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
यातील संजय दिनकर पोवार, जयसिंग भिकाजी खोपकर, सुजित वसंत खोपकर, तानाजी आनंदा खोपकर, ओंकार राजाराम खोपकर, राहुल आनंदा पाटील व नंदकुमार दत्तू कांबळे या सात जणांना अटक केली असून पन्हाळा न्यायालयात हजर केले असता येथील न्यायालयाने त्यांची चार दिवसासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.
निवृत्त पोलीस कर्मचारी हिंदुराव लक्ष्मण पाटील यास अटक केली असता त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उर्वरित सतिश अंकुश खोपकर व अभिमन्यु भिमराव पाटील हे दोघेजण अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत जखमी पोलीस कॉन्स्टेबल मारुती महिपती पाटील यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार धबधबेवाडी ता.पन्हाळा येथील ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. निकालानंतर सायंकाळी विजयी उमेदवारांनी काढलेली मिरवणुक पराभूत उमेदवाराच्या घरासमोरून जात असताना वादावादीला सुरवात झाली. त्याचे रुपांतर मोठया दंगलीत होऊ लागले होते. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून बंदोबस्तास असलेले कॉन्स्टेबल मारुती पाटील तेथे गेले व भांडण थांबवण्याचा व जमाव पंगवण्याचा प्रयत्न करू लागले. त्याच वेळी फरारी आरोपी सतिश अंकुश खोपकर याने पाटील यांच्या डोक्यात काठी मारून त्यांना जखमी केले. जखमी पोलीस कॉन्स्टेबल मारुती महिपती पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक ऐ डी फडतरे करत आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यातील हिंदुराव पाटील हे निवृत्त पोलिस कर्मचारी आहेत. आपल्या कारकिर्दीत कायदा व सुव्यवस्थेसाठी कामगिरी पार पाडणाऱ्या निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यावरच शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याने गुन्हा दाखल होण्याची नामुष्की ओढावली आहे. तसेच या गुन्ह्यात गावातील इतर पोलिस कर्मचारी वर्गाचा देखील समावेश असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
Previous Articleजागतिक संकेतामुळे सेन्सेक्सची 800 अंकांवर झेप
Next Article जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीतील जखमीचा मृत्यू









