बदलीकडे दुर्लक्ष : स्थानिक अधिकाऱयांवर राजकीय वरदहस्त? कार्यालयांतून अधिकारी अद्याप कार्यरत
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव मतदार संघातील खासदारकीच्या पदासाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांसह स्थानिक अधिकाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र महापालिकेतील स्थानिक अधिकाऱयांची बदली करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. बेळगाव जिल्हय़ातील काही अधिकारी अजुनही कार्यरत आहेत. त्यामुळे या अधिकाऱयांवर राजकीय वरदहस्त आहे का? अशी विचारणा होत आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून, मंगळवारपासून अर्ज भरणा प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. निवडणुकीच्या नियमानुसार स्थानिक अधिकाऱयांच्या बदल्या जिल्हय़ाबाहेर करण्यात येतात. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ तसेच अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांची बदली जिल्हय़ाबाहेर करण्याचा आदेश शासनाने बजावला आहे. मात्र जिल्हय़ातील काही सरकारी कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हय़ातील अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अधिकाऱयांच्या बदल्या करणे बंधनकारक आहे. मात्र राज्य शासनाकडून याबाबत कोणताच आदेश अद्याप जारी करण्यात आला नाही. त्यामुळे निवडणूक नियमावलीत बदल झाला आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिका कार्यालयातील महसूल उपायुक्त बेळगाव जिल्हय़ातीलच रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांची बदली अन्य जिल्हय़ात करण्यात आली होती. मात्र या निवडणुकीवेळी त्यांची बदली झाली नाही. तसेच काही स्थानिक रहिवासी असलेले उच्च अधिकारी बेळगावात सरकारी कार्यालयात
आहेत.
पण त्यांच्या बदलीबाबत शासनाने निर्णय घेतला नाही. निवडणुकीच्या नियमानुसार सदर अधिकाऱयांना परजिल्हय़ात पाठविणे आवश्यक आहे. मात्र शासनाकडून याबाबत आदेश आला नसल्याने निवडणूक नियमावलीचा भंग होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राजकीय वरदहस्तामुळेच या अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या नसल्याची टीका नागरिक करीत आहेत.
बदल्या कधी होणार?
यापूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी महापालिकेतील विविध अधिकाऱयांच्या बदल्या जिल्हय़ाबाहेर करण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी या अधिकाऱयांची बदली करण्यात आली नाही. यापूर्वी निवडणुकीपूर्वीच अधिकाऱयांची बदली करण्यात येत होती. पण निवडणुकीची घोषणा झाली तसेच अर्ज भरणा प्रक्रियेस देखील प्रारंभ झाला आहे. मात्र जिल्हय़ातील स्थानिक अधिकाऱयांची बदली करण्यात आली नाही. या अधिकाऱयांच्या बदल्या कधी होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.









