नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने सभा घेण्याची मागणी : ग्रामपंचायतींचे काम सुरळीत करण्याची आवश्यकता
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या 7 ते 8 महिन्यापासून प्रशासकीय अधिकाऱयांतर्फे ग्राम पंचायतीचा कारभार सुरू होता. त्यामुळे अनेक ग्रामविकास अधिकाऱयांनी ग्राम पंचायतींकडे फिरकूनही पाहिले नाही. आता ग्राम पंचायत निवडणुका होवून अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडही झाली आहे. तेव्हा आता तातडीने विशेष ग्राम सभांचे आयोजन करुन त्या तातडीने घ्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तालुक्यातील ग्राम पंचायतमध्ये मागील अनेक महिन्यांपासून प्रशासकीय अधिकाऱयांच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वर्षातून दोनवेळा ग्रामसभा घेण्यात येतात. तर विशेष ग्रामसभा दोन महिन्यांतून एकदा घेणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी घेण्यात येणारी ही पहिली ग्रामसभा मानली जाते. त्यामुळे आता तालुक्मयात विशेष ग्रामसभा घेवून विस्कटलेल्या ग्राम पंचायतीचा कारभार सुरळीत आणण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या बेळगाव लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे लवकरच विशेष ग्रामसभा घेणे गरजेचे आहे. मात्र ग्राम पंचायतीमधील राजकारण आणि त्यामध्ये उमटणारे मतभेद यामुळे मागील अनेक वर्षांपासून काही ग्राम पंचायतींनी ग्रामसभा घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नवीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनीही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर ग्रामसभा झाल्याच नाहीत तर विकास कसा साधता येणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
ग्रामसभा घेण्याकडे अधिल कल
ग्राम पंचायतमध्ये चालणाऱया कारभाराबद्दल कोणालाच काही माहिती नसते. त्यामुळे अनेकांना अंधारात ठेवून ग्रामसभा घेतल्याचे भासविण्यातच काहींनी धन्यता मानली होती. मात्र यावेळी नवीन सदस्य आणि नवीन उमेंद या तत्त्वावर ग्रामसभा घेण्याकडे अधिल कल असल्याचे दिसून येत आहे. तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व आले आहे. त्या ठिकाणी बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होण्याचा ठराव मांडण्याची शक्मयता आहे. याकडेही अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
मागील सभागृहामध्ये काही नागरिकांना घेऊन ग्रामसभा आटोपत्या घेण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे नवीन चेहरा आणि नवीन कार्यपद्धत यासाठी नागरिकांनी अनेक नवीन चेहऱयांना पसंती दिली आहे. त्यामुळे नवीन सदस्य कशा प्रकारे विशेष ग्रामसभा घेतात याकडेही साऱयांचे लक्ष लागून आहे. विशेष करुन महात्मा गांधी, राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेच्या कामाकाजाबद्दल आणि या योजनेतून झालेल्या विकासाबद्दलचा आढावा ग्रामसभेत घेण्याची, निर्मल भारत अभियान, ग्राम पंचायतीमध्ये कोणती सुधारणा झाली, वसती योजनेतंर्गत लाभार्थ्यांची निवड योग्यप्रकारे आहे का? तसेच हा लाभार्थ्यांला याची खरच गरज आहे याची चाचपणी व यावर चर्चा करणे तसेच सरकारकडून येणाऱया योजनांचा लाभ किती जणांना झाला आहे? यावर चर्चा होणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे. नवीन सदस्य या सर्व योजनांचा आढावा घेवून ग्रामसभेत चर्चा करण्याची गरजही अनेक जाणकारांतून व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामसभाअभावी नागरिकांची गैरसोय
वर्षातून एकदा किंवा दोनवेळा ग्रामसभा घ्याव्यात, यासाठी तालुका पंचयतमधून नोटीसा बजावण्यात येतात. त्यानुसार काही ग्राम पंचायती केवळ दोन वेळाच ग्रामसभा घेतल्यानंतर वर्षभर त्याकडे पाठ फिरविली जाते. याचा फटका मात्र नागरिकांना बसतो. त्यासाठी राज्य सरकारने विशेष ग्रामसभा घेण्यासाठी ग्राम पंचायतींना मुभा दिली आहे. मागील 10 महिन्यांपासून कोरोनामुळे अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत आले असतानाच ग्राम पंचायतमधील विकास कामेही पडूनच आहेत. त्यामुळे आता या कामांना चालना देण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.









