तुमच्या किनाऱयावर निळय़ा लाटा आहेत का? पर्यटकांकडून होतेय विचारणा
मालवण:
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या समुद्रकिनाऱयांवर सध्या रात्रीच्यावेळी दिसणाऱया निळय़ाशार लाटा सर्वांनाच भुरळ घालत आहेत. या लाटा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. निळय़ा लाटा तुमच्या किनाऱयावर सध्या दिसतात का? अशी विचारणा पर्यटकांकडून होऊ लागली आहे. मात्र पर्यटनासाठी तारक ठरणाऱया या लाटा मासेमारीसाठी फारशा पोषक नाहीत. कारण या मनोहारी लाटांना कारणीभूत असलेल्या ‘नॉक्टीलुका’ (Noctiluca) हय़ा एकपेशीय डायनोफ्लाजेलेट प्लवंगांची झपाटय़ाने होणारी वाढ मासेमारीस अनुकुल नसल्याचे मत समुद्री जीव संशोधकांकडून व्यक्त होत आहे.
समुद्री जीव संशोधक स्वप्नील तांडेल यांच्या मते ज्या भागांमध्ये तुम्हाला या निळय़ाशार लाटा दिसतात, तेथे तुम्हाला माशांचे थवे दिसणार नाहीत. कारण या निळय़ाशार लाटांमागील नॉक्टीलुका प्लवंगांमुळे पाण्यात प्राणवायूचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हे प्लवंग जेथे मोठय़ा प्रमाणात असतात तेथून मासे दूर पळतात. त्याचप्रमाणे हे जीव जेव्हा मरतात, तेव्हा पाण्यात अमोनिआ वायू तयार होतो. अमोनिआ माशांसाठी अत्यंत घातक असतो. शिवाय हय़ा जीवांचा आकार मोठा असतो. छोटय़ा माशांच्या कल्ल्यांमध्ये हे जीव अडकून माशांचा मृत्यू होण्याची शक्यताही त्यामुळे वाढते. हे जीव ज्या भागात असतात, त्या ठिकाणी माशांचे अन्न असलेले डायऍटम आणि झू प्लँगटॉन, माशाची अंडी यांची शिकार करतात. त्यामुळे खाद्याअभावीसुद्धा मासे स्थलांतर करतात. म्हणूनच हे प्लवंग जेथे मोठय़ा प्रमाणावर असतात तेथे मासे सापडून येत नाहीत. त्यामुळे मत्स्य साठय़ांसाठी हा जीव अनुकुल नाही. हे प्लवंग जर मोठय़ा प्रमाणात पाण्यामध्ये असतील, तर दिवसा त्या भागातील पाण्याचा रंग गर्द हिरवा बनतो, असे स्वप्नील तांडेल यांनी सांगितले.
यांच्यामुळेच वाढले जेलिफिश
तांडेल पुढे म्हणाले, नॉक्टीलुका प्लवंगाची वाढ हे समुद्री अन्नसाखळीत झालेल्या बिघाडाचे द्योतक मानावे लागेल. सध्या किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात जेलिफिश सापडून येत आहेत. याचे आणखी कारण म्हणजे नाक्टील्युका या प्लवंगाची झालेली वाढ. हय़ा प्लवंगांना आपले भक्ष्य बनविण्यासाठी जेलिफिश मोठय़ा प्रमाणात किनाऱयालगत सरकत असावेत, अशी शक्यता आहे. लाटांवर पेटल्यासाररखा चमकणाऱया या नॉक्टीलुका स्किन्टिलन्स किंवा सी स्पार्कलच्या शरीरा ल्युसीफेरेन आणि लुसीफेरेज हे घटक असतात. ऑक्सिजनच्या सान्निध्यात आल्यानंतर समुद्रकिनाऱयावर आल्यानंतर समुद्राच्या हालचालीमुळे रासायनिक प्रक्रिया होते आणि प्रकाश प्रज्वलित होतो. हे प्राणी एकपेशीय प्लवंगातील प्रकार आहेत ते डायनोफ्लॅजिलएत या गटात मोडतात. प्लवंगाला हालचाल करण्यासाठी शेपटय़ा असतात आणि त्याचा उपयोग स्थलांतर आणि खाद्य पकडण्यासाठी होतो.
प्राणवायु नसलेले क्षेत्र तयार करतो – प्रा. डॉ. केतन चौधरी
रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. केतन चौधरी म्हणाले, निळय़ाशार लाटा तयार होण्याच्या प्रक्रियेला मच्छीमार चकमक किंवा जाळ असे म्हणतात. नोक्टीलुका या स्वजैवप्रकाशित प्लवंगामुळे अशा नील लाटा तयार होतात. पावसाळय़ात भू प्रदेशावरून समुद्रात मिसळणाऱया पाण्यातून पोषक घटक मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असतात. अशावेळी तापमान कमी झाले की प्लवंग लाटा तयार होतात. प्लवंगयुक्त पाणी घुसळले की प्लवंगातून जैव प्रकाश बाहेर पडतो. कमी प्राणवायु असलेले क्षेत्र तयार होते. थंडीच्या दिवसांमध्ये हय़ा निळाय़ा लाटा प्रामुख्याने दिसतात. उन्हाळय़ात पाण्यातील तापमान वाढले की हय़ा लाटा कमी होतात. कारण प्लवंगाची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होत नाही.
पर्यटनासाठी उपयुक्त
दरम्यान या निळय़ा लाटा पर्यटनासाठी पोषक ठरत असून रात्रीच्या वेळी या मनोहारी लाटांचा आनंद घेण्यासाठी, त्या कॅमेराबद्ध करण्यासाठी पर्यटक किनाऱयांवर धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे भविष्यात या लाटा ज्या हंगामात दिसून येतील, त्या हंगामात पर्यटकांना समुद्रकिनारी वळवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न नक्कीच केले जातील, असे वाटते.









