कोल्हापूर/प्रतिनिधी
कोणाला हातोडा, कुणाला कुदळ, कोणाला फावडं घ्यायचा असेल तर घेऊ द्या. आम्ही त्याला घाबरत नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. तो कोणासमोर झुकणार नाही. तसेच राणेंच्या विधानांना किमंत देत नाही. निलेश-नितेश हे संपलेलं गणित आहे.
असे विधान शिवसेनेचे नेते खा. विनायक राऊत यांनी केलं आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या आज कोकणात आहेत त्यांनी हातोडा घेऊन महा विकास आघाडी सरकारचा निषेध केला त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने काँग्रेसकडून जयश्री जाधव या निवडणूक लढवत आहेत. त्याप्रसंगी शिवसेनेचा मेळावा आज शाहू स्मारक भवन येथे पार पडतोय. त्यासाठी खासदार विनायक राऊत हे कोल्हापुरात आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विनायक राऊत पुढे म्हणाले, कोणाला हातोडा, कोणाला फावडा घ्यायचा ते घेऊ देत. शिवसेनेला फरक पडणार नाही. शिवसेनेचा मराठा मावळा आहे. तो दिल्लीच्या सत्ते समोर झुकणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
किरीट सोमय्या यांच्या समर्थनात आम्ही मैदानात उतरू, असा इशारा राणे यांनी दिल्यानंतर त्यावर देखील विनायक राऊत यांनी हल्लाबोल केला. राणेंच्या विधानांना मी फार किंमत देत नाही. नितेश आणि निलेश हे संपलेले गणित आहे, अशी टीका ही राऊत यांनी केली.









