‘मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात गणपती बाप्पाचे दरवषी आगमन होते. प्रतिवषी सारे लहानथोर या अत्यंत आवडत्या पाहुण्याचे मनापासून जोरात स्वागत करतात. पण यावषी कोरोनाच्या संकटाने उत्साहावर थोडे विरजण पडले आहे. आपण त्याला सर्व काही निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून गाऱहाणे घालू. या महामारीतून सुटका करण्यासाठी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नम् कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।। अशी प्रार्थना करूया! आज थोडय़ा वेगळय़ा श्लोकाने गणरायाला वंदन करून त्याचे आशीर्वाद घेऊया.
अगजानन-पद्मार्कं गजाननमहर्निशम्। अनेकदं सर्वभक्तानां एकदंतं उपास्महे।।
अर्थ-अग(पर्वत)जा म्हणजे पर्वताची मुलगी, पार्वतीच्या मुखरूपी कमळास फुलवणारा जणू सूर्यच अशा गजाननाची, भक्तांना अनेक गोष्टी देणाऱया त्या एकदंताची आम्ही रात्रंदिवस उपासना करतो.
येथे अगजानन व गजानन, अनेकदंत व एकदंत असे परस्परविरोधी शब्द आले आहेत. त्यामुळे कुतूहल निर्माण होते परंतु अनेकदं म्हणजे भक्तांना अनेक प्रकारे देणारा, तं म्हणजे त्याला अशी पदे सोडवल्यावर त्यांचा अर्थ लक्षात येईल. आणखी एक वैशिष्टय़पूर्ण श्लोक पाहू. तो अनुप्रास युक्त आहे.
वन्दे वन्दारु-मंदारं इन्दू-भूषण-नंदनम्। अमन्दानंद-सन्दोह-बन्धुरं सिन्धुराननम्।।
अर्थ:- मस्तकावर चंद्र(इंदू)धारण करणाऱया शंकराचा पुत्र असणाऱया, वंदन करणाऱयांना (वंदारु) कल्पवृक्षासारखा (मंदारं) म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, अशा उत्कट(अ-मंद म्हणजे मंद नसणारा) आनंदाच्या प्रचंड साठय़ाप्रमाणे(सन्दोह) असलेला आणि हत्तीचे मुख(सिंधुर-आनन)असलेल्या गणपतीला मी वंदन करतो. या श्लोकात न्द आणि न्ध ही अक्षरे वारंवार आल्याने अनुप्रास अलंकार साधला आहे. तसेच एक प्रकारचा नाद त्यात जाणवतो. मराठीतील ‘डोह’ हा शब्द पाण्याचा साठा या अर्थीच ‘संदोह’ शब्दावरून आला असावा. गणपती ज्ञानाची व बुद्धीची देवता आहे. गणपती हा रिद्धी आणि सिद्धी यांचा ईश मानला गेला आहे. रिद्धी म्हणजे लक्ष्मी. या संदर्भातला हा गणपतीचा आणखी एक श्लोक पाहू.
तमाखु -पत्रं राजेंद्र भज माज्ञान-दायकम्।
तमाखु -पत्रं राजेंद्र भज मा-ज्ञान-दायकम्।।
वरील श्लोकात वरवर पाहता सर्व शब्द सारखे वाटतात. पण समास आणि संधी सोडवल्यास दोन ओळींचा वेगवेगळा अर्थ लक्षात येतो.
अर्थ -1 ली ओळ- हे राजा, अज्ञानदायक (गुंगी आणणारे) असे तंबाखूच्या पानाचे सेवन तू करू नकोस. 2री ओळ- हे राजा, लक्ष्मी (मा) व ज्ञान देणाऱया (ज्ञानदायकम्), उंदीर(आखु) वाहन(पत्र) असणाऱया त्या गणपतीची सेवा कर.
प्रत्येक कार्याचा शुभारंभ हिंदू संस्कृतीत श्रीगणेश पूजनाने व वंदनेने होतो. संस्कृत कवींनी विविध प्रकारे त्याची स्तुती केली आहे, सद्बुद्धी, ज्ञान, लक्ष्मी, समृद्धी देण्यासाठी! आपणही त्याला हे सारे आम्हालाही देण्यासाठी ‘मनापासून’ विनंती करूया. तो नक्की प्रसन्न होईल.
तुम्हा तो श्रीगणेश सुखकर होवो!
गणपती बाप्पा मोरया!








