बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांचे मत
► प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव डायोसिसतर्फे डायसोसन डे ऑफ रिपार्टेशनमध्ये सहभागी होण्यासाठी शुक्रवारी कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील असंख्य ख्रिश्चन बांधवांनी नंदगड टेकडीवरील होली क्रॉसला भेट दिली. दरवर्षी गुडफ्रायडेच्या एक आठवडा आधी लेंटन सिझनचा भाग म्हणून याचे आचरण केले जाते. येथील इमॅक्युलेट चर्चमध्ये यानिमित्त दिवसभर प्रार्थना सुरू होती.
नंदगड येथील होली क्रॉसजवळ टेकडीवर विविध भाषांमध्ये प्रार्थना झाली. दुपारी 3.30 वाजता आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगावचे बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस होते. यावेळी उपस्थितांना संदेश देताना ते म्हणाले, की आपण निर्मळ आणि पवित्र मनाने होली क्रॉसला भेट दिली पाहिजे. आपण केलेल्या पापांसाठी आपण देवाकडे क्षमा मागितली पाहिजे.
धार्मिक ठिकाणी जाऊन आपण देवाचे आशीर्वाद घेऊ शकतो. पण आपल्याला आपण केलेल्या पापाचा किंवा दुष्कृत्याचा पश्चाताप होत नसेल तर आपली प्रार्थना व्यर्थ आहे. म्हणून आपण स्वत:मध्ये सद्वर्तनाचा संस्कार रुजवायला हवा. यशुप्रमाणे आपण सर्वांनी दया, क्षमा, शांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे. यावेळी रेव्ह. शांतप्पा बोरकर, फादर फिलीप कुट्टी, फादर कुस्टास्लीमा, फादर प्रमोद कुमार आणि अन्य सहभागी उपस्थित होते.









