पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी कार्याचा घेतला आढावा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणू सर्वत्र पसरल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जारी केला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शहरातील अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांसह दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून गरजू, गरीब व्यक्तींना जेवण, धान्य, फळे, पाण्याची बाटली, चहा-बिस्कीटे देऊन मदत दिली जात आहे.
अशीच मदत निर्मल फौंडेशनच्यावतीने गेल्या कित्येक दिवसांपासून दिली जात आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी निर्मल फौंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला आणि फौंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या उपक्रमाला शुभेच्छा देऊन आपलाही पाठिंबा दर्शविला.
यावेळी रवी कदम, उमेश पाटील, विनायक चौगुले, श्रीनिवास बिसनकोप, विशाल सुतार, श्री लोहार, संतोष उसुलकर, विनायक सुतार यांच्यासह निर्मल फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.









