आरोपी मुकेशकुमारच्या दया याचिकेने विलंब
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणातील दोषी गुन्हेगारांच्या फाशी शिक्षेची होणारी अंमलबजावणी आता 22 रोजी वरून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दया याचिका फेटाळल्यानंतरही गुन्हेगारांना 14 दिवसांचा कालावधी दिला जातो, असे सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात सुनावणीवेळी सांगितले आहे. तसेच डेथ वॉरंटविरोधात सत्र न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयात आरोपी जाऊ शकतात, असेही म्हटले आहे.
यातील आरोपी मुकेश याने क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. ही याचिका फेटाळून लावली तरीही 14 दिवसांचा अवधी मिळावा, असे त्याने म्हटले आहे. त्यावर सरकारी वकिलांनीही आक्षेप घेतला नाही. दया याचिका फेटाळल्यानंतरही गुन्हेगाराला 14 दिवसांचा अवधी दिला जातो, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने डेथ वॉरंट विरोधात मुकेशने दाखल केलेल्या याचिकेवरून कडक सूचना केल्या आहेत. याची सुनावणी बुधवारी सुरू करण्यात आली. तुरुंग अधिकाऱयांनी पहिली नोटीस बजावण्यास इतका उशीर का झाला? अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. आपल्या व्यवस्थेचा दोषींकडून कशाप्रकारे दुरुपयोग केला जात आहे, हे स्पष्ट होत असून, यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास कमी होईल, असेही न्यायालयाने सरकार आणि पोलीस यंत्रणेला परखड शब्दात सांगितले आहे.









