9 देश अद्याप खरेदी करत आहेत कच्चे तेल : भारतीय कंपन्यांचाही खरेदीदारांमध्ये समावेश
युक्रेनवर हल्ल्यानंतर रशियाला अनेक प्रकारच्या निर्बंधांना तोंड द्यावे लागत आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकेने रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर निर्बंध लादले आहेत. परंतु युरोपीय महासंघाचे काही देश कच्चे तेल खरेदी करण्यावर निर्बंध लादण्याच्या निर्णयाशी सहमत नाहीत.
युरोपीय महासंघाकडून बंदी घालण्यासाठी 27 सदस्य देशांमध्ये सर्वसंमती आवश्यक आहे. परंतु असे घडत नसल्याने युरोपीय देश अद्याप रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहेत. याचबरोबर कच्चे तेल खरेदीदारांमध्ये भारतही सामील आहे. या देशांकडून कच्चे तेल खरेदी होत असल्याने निर्बंधांनंतरही रशियाचा कच्च्या तेलाचा व्यापार चमकत आहे.
भारत
भारताच्या दोन मोठय़ा तेरल कंपन्या हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइलने अलिकडेच रशियाकडून सुमारे 50 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. भारतातील खासगी कंपनी नायारा एनर्जीमध्ये रशियाच्या रोसनेफ्टची हिस्सेदारी असून त्यानेही 18 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केली आहे.
बुल्गारिया
बुल्गारियाच्या नेफ्टोचिम बर्जस नावाच्या रिफायनरीचा मालकी हक्क रशियाच्या ल्युक ऑईलकडे आहे. याचे 60 टक्के इंधन रशियामधून येते.
जर्मनी
जर्मनीची सर्वात मोठी रिफायनरी मीरोमध्ये 24 टक्के हिस्सा रशियन कंपनी रोसनेफ्टचा आहे. कंपनीसाठीचे 14 टक्के कच्चे तेल रशियामधून येत आहे. याचबरोबर जर्मनीच्या पीसीके श्वेटमध्ये रोसनेफ्टची 54 टक्के हिस्सेदारी असून ही देखील रशियन कच्च्या तेलाचा वापर करत आहे. एक अन्य जर्मन रिफायनरी लेऊना देखील रशियन कच्च्या तेलाच्या मदतीनेच संचालित होत आहे.
इंडोनेशिया
इंडोनेशियाची सरकारी ऊर्जा कंपनी पर्टामिना रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा विचार करत आहे.
ग्रीस
ग्रीसची सर्वात मोठी ऑइल रिफायनरी हेलेनिक पेट्रोलियम स्वतःच्या गरजेच्या 15 टक्के कच्चे तेल रशियाकडून खरेदी करत आहे. कंपनीने सौदी अरेबियाकडून अलिकडेच मोठय़ा प्रमाणात कच्चे तेल खरेदी केले आहे.
इटली
इटलीची सर्वात मोठी रिफायनरी आएसबीवर ल्युक ऑइलचा कब्जा असून तेथेही काही प्रमाणात कच्चे तेल रशियामधून येत आहे.
हंगेरी
हंगेरीची तेल कंपनी एमओएल क्रोएशियाची हंगेरी आणि स्लोवाकियामध्ये तीन ऑइल रिफायनरीज ओत. या रिफायनरींमध्ये रशियामधूनच कच्चे तेल येत आहे. हंगेरीने रशियावरील गॅस आणि तेल क्षेत्रातील निर्बंधांना विरोध दर्शविला होता.
नेदरलँड्स
जीलँड रिफायनरी या डच कंपनीत ल्यूक ऑइलची 45 टक्के हिस्सेदारी आहे. या कंपनीने रशियाकडून खरेदी केल्या जाणाऱया कच्च्या तेलाबद्दल माहिती देणे टाळले आहे. एक अन्य डच कंपनी एक्सॉन मोबिलने देखील यावर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.
या कंपन्यांकडून खरेदी बंद
ब्रिटनची बीपी कंपनी, जपानची ईएनईओएस, इटलीची ईएनआय, नॉर्वेची ईक्यूयुआयएनओआर, पोर्तुगालची गाल्प, फिनलंडची नेस्टे, स्वीडनची प्रीईम आणि वारो एनर्जी, स्पेनमधील रेपसोल तर फ्रान्सच्या टोटल एनर्जीजने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. याचबरोबर पोलंडमधील सर्वात मोठी तेल कंपनी पीकेएन ओरेलनने स्वतःच्या पोलंड, लिथुआनिया आणि चेक प्रजासत्ताकमधील स्वतःच्या प्रकल्पांसाठी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबविले आहे.









