पालकमंत्री जयंत पाटील घेणार आज आढावा
प्रतिनिधी/सांगली
जिह्यात लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने, मॉल, आठवडा बाजार बंदच आहेत. दुकाने बंद राहिल्याने व्यवसाय बुडत आहे. त्याविरोधात भाजप, बहुजन वंचित आघाडीसह काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवारपासून निर्बंधातून शिथिलता देण्याची मागणी असताना पालकमंत्री पाटील हे आज रविवारी प्रशासनासोबत बैठक घेणार असून त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
जिह्यात ब्रेक द चेनअंतर्गत 15 एप्रिलपासून लॉकडाऊन पाळला जात आहे. शासनाने प्रत्येक जिह्यातील पॉझिटीव्हीटी रेट पाहून संबंधित जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णांचे प्रमाण हजार ते बाराशेपर्यंत स्थिरावले आहे. जिह्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळून अन्य दुकाने आणि व्यवसाय बंदच आहे. आठवडा बाजार, कापड, भांडी, मोबाईल शॉपी, सोन्याची दुकाने, मोटर सायकल दुरुस्ती गॅरेज, स्पेअर पार्ट दुकाने, पान टपरी, रंगाची दुकाने यांना गेल्या साडेतीन महिन्यापासून टाळेबंदीचा सामना करावा लागत असल्याने व्यापारी व व्यावसायिक हतबल झाले आहेत.
सांगली जिल्हा सध्या चौथ्या टप्प्यात आहे. तिसऱया स्तरात पोहोचण्यासाठी पॉझिटिव्हीटी दर 10 टक्क्यांच्या आत असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनाने सध्या होणाऱया चाचण्यांमध्ये दुप्पट वाढ केली आहे. तरीही पॉझिटिव्हीटी दर कमी होत नसल्याचे स्पष्ट झाले.
पालकमंत्री जयंत पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन शिथिलतेसाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याने व्यापारी आणि नागरिकांतून नाराजी वाढत आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर जिह्यात तीन महिन्यांनी रुग्णसंख्या कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या अडीच महिन्याच्या कालावधीत फरक काय पडला? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे पालकमंत्री कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








