तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी संचारबंदी पंढरपूर शहरात लागू होण्याची शक्यता आहे. वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे येणाऱ्या वारकरी दिंड्यांना शासनाने मज्जाव केला असताना. 22 नोव्हेंबर पासून 26 नोव्हेंबर पर्यंत पंढरपूर परिसरातील एसटी सेवादेखील बंद करण्याचा प्रस्ताव पोलीस विभागाच्या वतीने राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
आषाढीनंतर कार्तिकी वारी देखील निर्बंधात होणार आहे. यामध्ये दोन दिवस संचारबंदी लागू होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होऊ नये. याकरिता 22 नोव्हेंबर पासूनच एसटी सेवा बंद करण्याची तयारी पोलिस प्रशासनाने केली आहे. याबाबतचा आदेश लवकरच राज्य शासनाकडून पारित होईल. तसेच कार्तिकी वारी बाबत नुकतीच वारकरी प्रतिनिधींशी चर्चा झाली आहे. वारकऱ्यांच्या काही मागण्या शासन दरबारी पोहोचून त्याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल. आषाढी प्रमाणे निर्मनुष्य कार्तिकी वारी पंढरपुरात होईल. यासाठी सतराशे पोलीस आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी झेंडे म्हणाले. प्रसंगी पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम उपस्थित होते.









