मोदींनी चीनची घुसखोरी झालीच नाही असे सुचवून देशभर वादळ उठवले होते, त्या वादळाला एक वर्ष उलटले पण चिनी ड्रगन या ना त्या प्रकारे भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न करत आहे .
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एकामागून एक धक्के बसू लागले आहेत. पंधरा ऑगस्टला तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर आश्चर्यकारकरित्या कब्जा करून नवी दिल्लीपुढे दहशतवादाचे नवे आव्हान उभे केले. दुसरीकडे भारताच्या पाचवीला पुजलेल्या चीन आणि पाकिस्तानचे गुळपीठ वाढू लागले. गेल्या वषी चीनने लडाख भागात जोरदार घुसखोरी करून भारताला जबर धक्का दिला होता. गाल्वान खोऱयात 20 बहादूर सैनिकांनी बलिदान करून चीनला भारत हा 1962 सारखा लेचापेचा देश राहिला नाही याची जाणीव करून दिली. चीनने आता परत आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपराष्ट्रपती वेंकया नायडू यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱयाला त्याने आक्षेप घेतला आहे तर त्याच्या ‘ग्लोबल टाईम्स’ या मुखपत्राने भारताने बऱया बोलाने नमते घेतले नाही तर त्याला दारुण पराभवाचा सामना करावा लागेल असा कडक इशारा नुकताच दिलेला आहे. अफगाणिस्तानच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान, चीन, रशिया आणि इराण या चार देशांची भारताच्या विरोधात अभद्र युती होऊ लागली आहे. थोडक्मयात म्हणजे भारत हा आंतरराष्ट्रीय कूटनीनिक जाळय़ात अडकला गेला आहे आणि त्याचे शत्रू हे त्याला हरप्रकारे नामोहरम करण्यासाठी कट कारस्थाने करत आहेत. भारताकरता जणू आभाळच फाटले आहे.
गेल्या आठवडय़ात चीनने भारताला अनपेक्षितरित्या अजून एक तडाखा दिला. त्यातून पूर्णपणे सावरण्यासाठी भारताला वेळ लागणार आहे. कारण चीनचा हा डाव किती खोल आहे त्याबाबत अजून फार माहिती नाही. सगळे चाचपडणेच आहे. जगातील भारताच्या सर्वात विश्वासू मित्र राष्ट्राला-भूतानला-चीनने साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून फितवले आहे असे दिसत आहे. भारताला अंधारात ठेवून भूतानने चीनबरोबर असलेला आपला जुना आणि जटिल असा सीमाविवाद सोडवण्यासाठी गेल्या आठवडय़ात एक करार केला.
चीन आणि भूतानमधील या कराराची भारताने ‘नोंद घेतलेली आहे’ असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले खरे पण त्याच्या या विधानातच नवी दिल्लीची झालेली जबर गोची दिसत आहे. भूतानने या करारासंबंधी भारताला विश्वासात घेतले होते काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता त्याबाबत प्रवक्त्याने पाळलेले सोयीस्कर मौन बरेच काही बोलून जाते. एप्रिलपासून या करारासंबंधी बोलणी सुरु होती असे आता बाहेर आले आहे. या कराराचा अर्थच भारताला एकाकी पाडण्यासाठी चीनने नवीन खेळ सुरू केला आहे. चीनने भूतानला पुढे करून मोदी सरकारला एक निर्णायक तडाखा मारला आहे असेच आंतरराष्ट्रीय कूटनीतिक वर्तुळात बोलले जात आहे.
याला कारण असे की भूतानने जर सरतेशेवटी चीनला आवडेल अशा पद्धतीने अंतिम सीमा करार केला तर त्याने भारताची सीमा धोक्मयात येणार आहे. 2017 साली डोकलाम या भूतानच्या परिसरात चीन हातपाय पसरू लागला तेव्हा भूतानचे संरक्षण कवच असलेल्या भारतीय सेनेने चिनी फौजाना अडवले होते आणि चीनला नंतर नमते घ्यावे लागले होते. डोकलाम हे भारताच्या सीमेलगत असल्याने चीनला दूर ठेवणे भाग होते. चार वर्षात चीन डोकलाम परिसरातदेखील पाय पसरायला लागला आहे. चीनचे अध्यक्ष शी जीन पेंग आपली नखे हळूहळू बाहेर काढत आहेत. माओ नंतरचा सर्वशक्तिमान नेता आपण आहोत हे जगाला दाखवायला त्यांना घाई झालेली आहे., त्यामुळे एकीकडे तैवानशी त्यांनी उभा दावा पत्करला आहे. ‘चीनचे एकीकरण होणारच’, अशी घोषणा करून त्यांनी तैवानला धमकी दिली आहे त्याचा परिणाम उलटाच झाला आहे., तैवानचे नेतृत्व आणि जनता त्यामुळे खवळले आहेत. कूटनीतिक वर्तुळात असे मानले जात आहे की शी जीन पेंग हे तैवानवर डोळा ठेवून असले तरी सध्या त्यांची नजर भारतावर आहे. ‘कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना’ असा त्यांचा डाव दिसत आहे. ज्याप्रकारे पूर्व लडाख मध्ये चिनी फौजांची जमवाजमव झाली आहे त्यामुळे त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय फौजादेखील तत्पर आहेत हे सैन्य दल प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचे गेल्या आठवडय़ातील विधान बोलके आहे. याचा अर्थ सीमेवर येत्या काही महिन्यात बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते अशीच ही स्पष्ट कबुली आहे.
‘कोणी आले नाही आणि कोणी गेले नाही’ अशा शब्दात मोदींनी चीनची घुसखोरी झालीच नाही असे सुचवून देशभर वादळ उठवले होते. त्या वादळाला एक वर्ष उलटले पण चिनी ड्रगन या ना त्या प्रकारे भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न करत आहे हे आता आंधळय़ालादेखील दिसत आहे. चीनबाबत सत्ताधाऱयांची दातखीळ का बरे बसली आहे असा सवाल विरोधक विचारत आहेत. भारताच्या शेजारी राष्ट्रांना हाताशी धरून चीन कळत नकळत भारताला वेढा घालत आहे असे आरोप होत आहेत. भाजपमधील सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखा असंतुष्टांचा एक गट मोदींच्या नेतृत्वाखाली ना देशाचा आर्थिक विकास झाला ना जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली गेली असे सुचवत आहे. चिनी ड्रगॉनचे फुत्कार हेच दाखवत आहे असे त्याचे मत आहे. रात्र वैऱयाची आहे हेच खरे.
सुनील गाताडे








