कोरेगाव / वार्ताहर :
ज्यांच्या हातात जिल्हा आहे, ज्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, ते महसूल, ग्रामविकास, पोलीस आणि आरोग्य विभागाचे प्रमुख केवळ कार्यालयात बसून कागदी घोडे नाचविण्याचे काम करत होते. फिल्डवर हे लोक कधी फिरकलेच नाहीत. केवळ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविकाच गावपातळीवर काम करत होत्या, त्यामुळे या अधिकाऱयांना कोरोनाची दाहकता जाणवलीच नाही. परिणमी निर्णय प्रक्रिया योग्य पध्दतीने राबिवली नाही. प्रशासनच कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे, पूर्णत: फेल झाले आहे, त्याचे खापर लोकप्रतिनिधींवर फोडणे एकदम चुकीचे आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचना सन्मानाने स्वीकारल्या असत्या, गावपातळीवर विलगीकरण कक्ष तयार केले असते, कोविड सेंटर्सची उभारणी केली असती तर सातारा जिह्यातूनच कोरोना कधीच हद्दपार झाला असता, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
प्रसिध्दी माध्यमांमध्ये काल जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी कोरोनाच्या लढय़ात कमी पडतात, अशी टीका झाली होती, त्यावर स्पष्टीकरण देताना आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, काही महत्वाच्या बैठकांना मी उपस्थित होतो, तेथे उपस्थित असलेल्या एका अधिकाऱयास कोरोनाची बाधा झाली, त्यामुळे मी खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी केली असून, होम आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे मी सातारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीस उपस्थित राहू शकलो नाही. याबाबतची पूर्वकल्पना मी अजितदादा पवार यांना दिली होती.
कोरेगाव येथील पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना त्यांनी प्रशासनाच्या अक्षम्य चुकांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढला, आम्ही वेळोवेळी सूचना करुन देखील, प्रशासनाने त्या गांभीयाने घेतल्या नाहीत, त्यांनी केवळ रिपोर्टिंग करत बैठकांचे फार्स केले, त्यातून काहीही हाशील झाले नाही. शेवटच्या क्षणी कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर आता लोकप्रतिनिधींच्या नावाने खडे फोडणे एकदम चुकीचे आहे.
जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता, कोरोनाचा वाढता वेग लक्षात घेता सातारा येथे जंबो कोविड हॉस्पिटलची उभारणी करत असताना पाचशेपेक्षा जास्त बेड्स असावेत, अशी सूचना केली होती, मात्र त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शाहू स्टेडिअम येथे 78 बेड्सचे जंबो कोविड हॉस्पिटल उभारले, त्यावेळी सुध्दा आम्ही लोकप्रतिनिधींनी सातारा हा केंद्र बिंदू न ठेवता जिल्ह्याच्या वेगवेगळय़ा ठिकाणी, ग्रामीण भागात कोविड सेंटर्सची उभारणी करण्याची सूचना केली होती, मात्र प्रशासन हे गांधारीच्या भूमिकेत होते. त्यांनी हम करे सो कायदा, ही भूमिका शेवटपर्यंत ठेवली, त्यातून जिह्याच्या मानगुटीवर कोरोनाचे भूत बसले. जर लोकप्रतिनिधी एकत्रित आले असते तर प्रशासनावर दबावगट तयार झाला असता आणि कोरोनाचे काम गतीने झाले असते. जर लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेली दाहकता वेळीच शासनाच्या निदर्शनास आली असती, तर सातारा जिह्यावर ही वेळ आलीच नसती, असेही शिंदे म्हणाले.