लेखक-कवी तर कोरोनावर आपल्या लेखनातून कशी प्रतिक्रिया नोंदवितात, याला अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण त्याकाळात अन्य कोणाच्याही प्रतिक्रियांपेक्षा लेखक-कवींच्या लेखन प्रतिक्रिया या पुढील अनंतकाळ टिकणाऱया असतात.
पुढील काळात कोरोनाच्या महामारीचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तेव्हा त्याचे वर्णन इतिहासकारांना माणसाला कीटकनाशकाप्रमाणे संपवणारा विषाणू असे कोरोनाला संबोधावे लागेल. एवढे माणसाला कोरोनाने शूद्र करून सोडले आहे. आपण एका क्षणभंगूर जीवनाचे साक्षीदार बनत आहोत. माणसाचे माणूस म्हणून काही असणारे स्वतंत्र अस्तित्वच कोरोनाने संपवून टाकले आहे. ज्याला त्याला भयग्रस्ततेने ग्रासले आहे. अशा काळात माणूस दुसऱयांचा विचारच करत नाही की काय असे अनुभव सार्वत्रिक होत आहेत. तर अशाही काळात माणुसकी शिल्लक आहे, असेही अनुभवास येत आहे. माणूस सगळय़ात कुणाला घाबरत असेल, तर तो मृत्यूला. प्रत्येकाला आपला जीव महत्त्वाचा वाटतोच, कारण जगण्यातच मौज आहे, असे मानून जगणारा बहुसंख्य वर्ग असतो. तो सर्वस्तरात असतो आणि अशा सर्वस्तरातील माणसाला कोरोना आपल्याही शरीरात वास करणार नाही ना अशा शंकेने पछाडले आहे. अशा सार्वत्रिक नाशाच्या काळात कलावंत त्याकडे कसे पाहतो हेही महत्त्वाचे ठरते. लेखक-कवी तर यावर आपल्या लेखनातून कशी प्रतिक्रिया नोंदवितात, याला अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण त्याकाळात अन्य कोणाच्याही प्रतिक्रियांपेक्षा लेखक-कवींच्या लेखन प्रतिक्रिया या पुढील अनंतकाळ टिकणाऱया असतात. कारण त्याला साहित्यिक मूल्य असते. जे मूल्य त्या काळाच्या एकूण व्यवस्थेचा, त्याचबरोबर समाजाचाही चेहरा उघडा करत असते. विजय चोरमारे या मराठीतील लोकप्रिय कवी-अनुवादकाने कवितेतून जी आजच्या या वातावरणाची प्रतिक्रिया नोंदविली आहे, ती फार बोलकी आहे, ते आपल्या ‘माणसाचे निर्जंतुकीकरण’ या कवितेत म्हणतात,
- ‘निर्जंतुकीकरण केलं जातंय माणसाचं
- त्यांचे कपडे मळले आहेत
- त्यांच्या केसावर चेहऱयावर
- धुळीचे थर साचलेत
- ओळखता येणार नाहीत, त्यांच्या घरच्यांनाही आपली माणसं
- एवढे जाड थर
- पाय फाटलेत चिंध्या झाल्यात तरी थकलेले नाहीत
- कापायचीय खूप लांबची वाट
- जगण्याच्या या मॅरेथॉनमध्ये
- जे घरापर्यंत पोहोचतील ते सगळे जिंकतील
- बाकी माहीत नाही, शर्यत अर्ध्यात कितीजण सोडणार आहेत!’
कोरोनासारखी महामारी असो, की अन्य कोणत्याही कारणाने, कोणत्याही देशात टाळेबंदी लागू होते, त्यात सर्वाधिक भरडला जातो, तो श्रमकर्ता वर्ग. चोरमारे यांची कविता याचेच तर विदारक चित्र मांडते. अशाकाळात कवी व्यवस्थेच्या कोणत्या बाजूने उभा राहतो हे महत्त्वाचे ठरते. त्याला लॉकडाऊनच्या काळात उंच-उंच इमारतीत चोवीस तास घरात मनोरंजनाची साधने असतानाही अडकून पडलेली माणसे महत्त्वाची वाटतात, की याच काळात दुसरीकडे हातावर पोट असणाऱया माणसांचे भूकबळी जात आहेत ते महत्त्वाचे वाटते. या लॉकडाऊनच्या काळात माणसे जागोजागी अडकून पडली आहेत. त्यांना अन्नाविना जगावे लागत आहे. हजारो लोक शेकडो मैल पायी आपला गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही त्यांना आपला गाव सापडत नाही. व्यवस्था आशेचे किरण दाखविते पण ती पुन्हा अशा माणसांकडे फिरकतच नाही. लोंढेच्या लोंढे सीमेवर अडकून पडले आहेत. हे अडकून पडलेले कोण आहेत? ते प्रस्थापित व्यवस्थेतून बाहेर फेकले गेलेले लोक आहेत. अशा लोकांचे जगणेच किडय़ामुंग्यांसारखे असते. म्हणूनच अशा लोकांवर भररस्त्यावरच निर्जंतुकीकरणाची फवारणी केली जात आहे. पण अशाही कसोटीच्या काळात काही माणसे आपल्यातील संवेदनशीलता संपू देत नाहीत. आपल्यातील सहृदयता जपताना इतरांच्या कल्याणासाठीही प्रार्थना करत असतात. याचेच यथार्थ वर्णन कवयित्री प्रा. नीलम यादव या आपल्या कवितेतून करतात. त्या आपल्या कवितेत म्हणतात,
- मी पाहतेय, कधीही दिसला नाही, इतका हतबल माणूस
- कधीही पाहिला नाही, असा माणसातला माणूस
- मी उभी आहे, संवेदना गोठून जाण्याच्या या काळात
- विनाशाच्या उंबरठय़ावर
- जपावीत तरीही शक्मय तितकी नाती
- विसरून जावा जात धर्म
- आणि करावी प्रार्थना इथल्या प्रत्येकासाठीच
कोरोनाने सर्वस्तरातील माणसाला एका पातळीवर आणले आहे. माणूस लहान-मोठा हा भेद मिटून टाकला आहे. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे तो पाहत नाही. सगळय़ांच्याच मनात एकच भावना निर्माण केली आहे. ती म्हणजे चिंता. म्हणूनच माणसाने आपल्या जातीचा-धर्माचा वृथा गर्व सोडून दिला पाहिजे. अस्मितेतून बाहेर पडून आपण सगळे एकच आहोत, या भावनेने जगायला पाहिजे. अशावेळी कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या कवितेची आठवण झाल्यावाचून राहत नाही-
- नंतर उरल्या-सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये
- काळागोरा म्हणू नये, तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र, असे हिणवू नये
- कुठलाही पक्ष काढू नये, घरदार बांधू नये, नाती न मानण्याचा
- आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करू नये
- आभाळाला आजोबा अन् जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत
- गुण्यागोविंदाने आनंदाने राहवे
- चंद्रसूर्य फिके पडतील, असे सचेत कार्य करावे
- एक तीळ सर्वानी करंडून खावा माणसावरच सूक्त रचावे
- माणसाचेच गाणे गावे माणसाने
अजय कांडर








