आठवे जिल्हासत्र न्यायालयाने अटीवर मंजूर केला जामीन
प्रतिनिधी /बेळगाव
संशयित आरोपीने नियोजित वधूवरच बलात्कार केला. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तिने त्या वराच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
नरसोबा सांबरेकर (रा. कोंडसकोप) असे त्या वराचे नाव आहे. त्याचा साखरपुडा 30 नोव्हेंबर 2020 रोजी अमरापूर येथील एका तरुणीशी झाला होता. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2021 रोजी संशयित आरोपी याने तरुणीसोबत जबरदस्तीने संबंध ठेवले. मार्च व एप्रिल 2021 मध्ये सुद्धा त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ती तरुणी गर्भवती झाली. त्या तरुणाने तिच्याशी व तिच्या कुटुंबीयांशी भांडण काढुन मी लग्न करणार नाही, असे सुनावले.
त्यानंतर त्या तरुणीने कित्तूर पोलीस स्थानकामध्ये नरसोबा याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कलम 420 व 376 अन्वये गुन्हा दाखल केला. दि. 4 जुलै 2021 रोजी त्याला अटक करण्यात आली होती. त्याने न्यायालयाकडे जामीनसाठी अर्ज दाखल केला. आठवे जिल्हासत्र न्यायालयामध्ये त्या अर्जावर सुनावणी झाली. न्यायाधीश हेमंतकुमार सी. आर. यांनी त्या संशयित आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
एक लाखाचे दोन जामीनदार, साक्षीदारांना धमकावू नये, प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहणे या अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. संशयिताच्यावतीने ऍड. प्रताप यादव व ऍड. आनंद घोरपडे यांनी काम पाहिले.









