कबनूर / वार्ताहर
नियोजित कराड ते बेळगाव आणि हातकणंगले ते इचलकरंजी नवीन रेल्वे मार्ग या दोन्ही रेल्वेमार्गाला 14 गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. खासदार धैर्यशील माने यांनी या मार्गांसाठी निधीची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाने दोन्ही मार्गाचे काम थांबवावे. कोणताही निधी उपलब्ध करून देऊ नये, अन्यथा शेतकऱ्यांना याविरोधात रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व रेल्वे विरोधी कृती समितीचे सदस्य जयकुमार कोल्हे यांनी दिला आहे.
रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना मध्य रेल्वे महाप्रबंधक संदीप मित्तल यांनी शुक्रवारी 22 रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनलला भेट दिली. त्यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी त्यांची भेट घेऊन निधीची मागणी केली आहे. या दोन्ही रेल्वे मार्गामध्ये शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असणाऱ्या जमिनी जाणार आहेत. त्यामुळे त्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी या दोन्ही रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम बंद पाडले होते. या मार्गावरील कबनुर चंदुर, रुई, कोरोची, हातकलंगले, कुंभोज, नेज, मजले आदी गावातील शेतकर्यांच्या बागायत जमिनी जाणार आहेत. विविध गावाच्या पाणीपुरवठा योजनांच्या जलवाहिन्या उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत रेल्वे विरोधी कृती समितीची स्थापना केली आहे.
Previous Articleहरियाणा : खेडा बॉर्डरवर तणाव वाढला; उद्या महापंचायत
Next Article सातारा : युवकांनी गावाचा लौकिक वाढवावा









