प्रतिनिधी/ पणजी
मडगाव येथील ज्वेलर स्वप्नील वाळके यांचे दिवसाढवळय़ा झालेले खून प्रकरण लुटीच्या उद्देशानेच झाले असल्याचे सीआयडी पोलीस तपासात आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. सीआयडी पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केले असून खून प्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी, पंचनाम्यावेळी सापडलेल्या वस्तू, पंचनामा तसेच सीसीटव्ही फुटेज सीलबंद काल मंगळवारी सीलबंद केले आहे. तसेच संशयित मुस्तफा शेख याला घटनास्थळी नेऊन सारा प्रकार कसा घडला, याची पुनर्तपासणीही करण्यात आली आहे.
सीआयडी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष टीम तयार केली असून त्यात दोन निरीक्षक व एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे. निरीक्षक सी. एल. पाटील हे तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
मडगावातील ‘कृष्णी ज्वेलर्स’मधून सोने लुटून आपल्याला आणून देण्यासाठी संशयित एव्हेंडर रॉड्रिग्ज याने संशयित मुस्तफा शेख याला 15 लाख रुपये देण्याचे ठरले होते. स्वप्नील वाळके यांचा खून मुस्तफा शेख याने केला असला तरी या साऱया प्रकारातील ‘मास्टरमांईड’ एव्हेंडर रॉड्रिग्ज असल्याचे आता तपासात उघड होत आहे. सोने लुटून दुकानाबाहेर आल्यानंतर मुस्तफाला पळून नेण्याचे काम एव्हेंडरचे होते. तिसरा संशयित ओंकार पाटील वाहन चालविणार होता, असे हे सारे नियोजन मास्टरमाईंड एव्हेंडर याने केले होते, हे आता तपासात सुस्पष्ट झाले आहे.
वाळकेच्या संघर्षामुळेच प्रकरण उघडकीस
मुस्तफा शेख याने स्वप्नील वाळके दुकानात एकटेच असल्याचे पाहिले होते. त्यामुळे त्याचा अगोदर खून करायचा आणि नंतर सगळे सोने लुटून पळण्याच्या उद्देशाने मुस्तफाने वाळके यांचा खून केला होता. वाळके धडधाकट शरीराचे असल्याने त्यांनी जखमी स्थितीतही मुस्तफाला प्रतिकार केला. त्याच्याशी संघर्ष करत दुकानाबाहेर आल्यामुळे सारा प्रकार तेव्हाच उघडकीस आला. अन्यथा कुणाच्याही लक्षात आला नसता.
सुरुवातीला मुस्तफा याने पोलिसांना चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. सीआयडी पोलिसांनी आपला खरा अवतार दाखविला तेव्हा मुस्तफा पोपटासारखा बोलायला लागल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ब्रेसलेटच्या निमित्ताने केली दुकानाची पाहणी
मुस्तफा शेख हा मडगावातच राहत असून खून होण्याच्या चार दिवसाअगोदर तो वाळके यांच्या दुकानात ब्रेसलेट (मास्कॉद) विकत घेण्याचे निमित्त करून गेला होता. त्याचवेळी त्याने दुकानाची सविस्तर पाहणी केली होती. वाळके दुकानात एकटेच असतात हे त्याला समजले होते. त्यामुळे वाळपेंचा खून करूनच दुकान लुटायचे असे त्याने ठरविले होते.
बिहारमधून आणले 42 हजारांचे पिस्तूल
वाळकेच्या दुकानाची लूट आणि खून फत्ते करण्यासाठी मुस्तफा शेखने बिहार येथे जाऊन 42 हजार रुपये खर्च करून देशी बनावटीचे पिस्तूलही आणले होते. केपे येथे दोन गोळ्या झाडून त्याने सरावही केला होता. ज्या ठिकाणी त्याने सराव केला होता, ती जागाही मुस्तफाने काल मंगळवारी पोलिसांना दाखविली आहे.
चारही संशयित गुन्हेगारी जगतात नावाजलेले
एव्हेंडर रॉड्रिग्ज, मुस्तफा शेख, ओंकार पाटील व गोन्साल्वीस हे चोघेही एकमेकाचे चांगले मित्र असून गुन्हेगारी क्षेत्रात ते नावाजलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मोबाईल दुकानात चोरी केली होती. त्यावेळी गोन्साल्वीस त्यांच्यासोबत होता. खून प्रकारणात गोन्साल्वीसचा सहभाग दिसला नसल्याने त्याच्या विरोधात अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही, असेही पोलिसांनी सांगितले.
मुस्तफा शेख कुख्यात गुन्हेगार
मुस्तफा शेख कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस स्थानकांत अनेक गुन्हे नोंद आहेत. ओल्ड गोवा येथे त्यांने एका इसमाचा खूनही केला होता. त्यात त्याला शिक्षाही झाली होती. तो खून मुद्दामहून झाला नसून झटापटीमध्ये झाला असल्याच्या मुद्यावर मुस्तफाला कमी काळ शिक्षा झाली होती. काही महिन्यापूर्वीच शिक्षा संपवून मुस्तफा बाहेर आला आणि त्याने हा दुसरा खून करण्याचे धाडस केले आहे. भारतीय दंड संहितेतील कोणती कलमे लागली की किती वर्षे शिक्षा होते, याबाबतची सर्व माहिती मुस्तफाला असल्याने तो दरवेळी वेडेपणा करण्याचे नाटक करीत असतो. त्यामुळे यावेळी पोलीस अधिकाधिक पुरावे गोळा करीत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
‘मास्टरमाईंड’ एव्हेंडरने सहा महिन्यांपूर्वीच ठरविला ‘प्लान’
मडगावातील सराफी दुकानात चोरी करण्याचे सहा महिन्यापूर्वीच ठरले होते. एव्हेंडर रॉड्रिग्ज व इतर संशयितांनी काही दुकानांची पाहणीही केली. वाळके यांचे दुकान लुटीसाठी योग्य असल्याने एव्हेंडरने तेच ‘टार्गेट’ ठरविले. वाळकेंच्या दुकानातून मुस्तफाने सोने लुटायचे आणि त्या बदल्यात मुस्तफाला 15 लाख रुपये देण्याचेही ठरले होते. दुकानात सोने कितीही मिळाले तरी चालेल, मुस्तफाला त्याचे 15 लाख रुपये मिळणारच होते. ओंकारचा हिस्सा ओंकारला मिळणार होता. प्रत्यक्षात कुणाला काहीच मिळाले नाही, मात्र स्वप्नील वाळकेंचा जीव गेला.
पिस्तूल खाली पडल्याने केले चाकूने दहा वार
ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी मुस्तफा सर्व तयारी करूनच स्वप्नील वाळके यांच्या दुकानात शिरला. एव्हेंडरच्या ‘प्लान’मध्ये बदल करत त्याने अगोदर वाळकेंचा खून करण्याचा प्रयत्न करत सरळ स्वप्नील वाळके यांच्यावर गोळी झाडली. त्याच स्थितीत स्वप्नीलने मुस्तफाला गच्च आवळून धरले. त्या झटापटीतच मुस्तफाकडील पिस्तूल खाली पडले. म्हणून नंतर मुस्तफाने आपल्या बरोबर नेलेल्या धारधार चाकूने वाळके यांच्यावर तब्बल दहा वार केले. वाळके यांच्याकडून स्वतःची सुटका करून तो दुकानाबाहेर आला आणि पळून जाण्यात यशस्वी झाला.
स्वप्नील वाळकेंनी मुस्तफाला पकडलेही होते
मुस्तफा पळण्याच्या स्थितीत दुकानाबाहेर आला तरीही स्वप्नील वाळके त्याच्या मागे बाहेर आले. त्यांनी मुस्तफाला पकडलेही होते. याचवेळी हेल्मेट परिधान करुन दुकानाबाहेर असलेल्या एव्हेंडरला प्रकरण नियंत्रणाबाहेर जात असल्याचे समजल्याने दोघांनीही पळ काढला. हे सर्व घडत असताना दुकानाच्या बाहेर उभा असलेला ओंकार पाटील यानेही धूम ठोकली, हा सारा नाटय़मय प्रकार त्या दिवशी घडल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले आहे.









