भीमापूरवाडीमधील प्रयोगशील शेतकऱयाचा उपक्रम : भाजीपाल्यासह फळ शेतीला पसंती
वार्ताहर / खडकलाट
अतिवृष्टी, अवकाळीचा फटका अन् कोरोनामुळे ठप्प झालेले व्यवहार यामुळे सर्व क्षेत्राबरोबरच बळीराजालाही मोठा आर्थिक फटका बसला. मात्र या संकटांना सामोरे जाताना पुन्हा नव्या उमेदीने बळीराजा कामाला लागला आहे. भीमापूरवाडी येथील युवा शेतकऱयाने आपल्या शेतीमध्ये नवनवे प्रयोग करताना अनेकांना बोध घेण्यासारखे उत्पादन घेतले आहे. आपल्या नियोजनबद्धतेला कष्टाची जोड देत शेती फुलवली आहे. यातून आर्थिक नफा मिळविण्याबरोबरच शेतीप्रयोग यशस्वी होत असल्याने मिळणारे समाधानही मोठे असल्याचे बाजीराव साळुंखे यांनी सांगितले.
भीमापूरवाडी येथील बाजीराव साळुंखे यांनी आपल्या साडेतीन एकर जमिनीत नेहमी नवनवे प्रयोग राबविले आहेत. आपल्या साडेतीन एकरापैकी सुमारे 30 गुंठे जमिनीत त्यांनी जे-9 जातीची केळी रोपे लावून दर्जेदार पीक घेतले. केळीबरोबरच त्यांनी 10 गुंठे क्षेत्रात सितारा जातीची मिरची, 10 गुंठे जमिनीत गहू, 30 गुंठे क्षेत्रात सेन्ट जातीची कोबी, 10 गुंठे जमिनीत टोमॅटो आणि 14 गुंठे क्षेत्रात 27 टन उसाचे उत्पादन घेतले आहे. बाजीराव साळुंखे यांनी नितीन बारवे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.
ठिबक आणि पाट पाण्याचा वापर
पिकासाठी पाण्याचे नियोजन करताना ठिबकचा वापर बाजीराव साळुंखे यांनी केला आहे. याबरोबरच काही पिकांना पाटाद्वारेही देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी योग्य नियोजनातून पाईपलाईन टाकण्यासह सदर पाईपलाईनला व्हॉल्वचा वापर तांत्रिकदृष्टय़ा केल्याचे पहावयास मिळते.









