मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा नववर्ष स्वागतानिमित्त संदेश
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील जनतेने तसेच गोव्यात आलेल्या पर्यटकांनी आणि पार्टी आयोजकांनी कोरोनाचे नियम पाळावे, कोरोना टाळा आणि काळजी घ्या, असा संदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. गांजा लागवडीबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला किंवा घेतलेला नाही आणि तो प्रस्ताव सरकार सध्या तरी पुढे नेणार नसल्याचे व स्थगित ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत यांनी बोलताना पुढे सांगितले की, गोव्यात मोठय़ा संख्येने पर्यटक आले आहेत. त्यांनी व गोव्यातील जनतेने कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. सर्वांनी ती जबाबदारी ओळखून सावध राहावे. मास्क, सामाजिक अंतर तसेच सॅनिटायझरसह एसओपीचे पालन करावे असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे.
युकेमधून आलेले 37 जण कोरोनाबाधित
गोव्यात युकेमधून डिसेंबर महिन्यात सुमारे 900 जण प्रवासी म्हणून आले असून त्यातील 37 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांना नवीन कोरोनाची लागण झाली आहे काय? याची तपासणी करण्यासाठी त्यांनी नमूने पुढे लॅबमध्ये पाठवण्यात आले असून फक्त 2 जणांचे अहवाल निगेटिव्ह मिळाले आहेत. उर्वरितांचे अहवाल अजून येणे बाकी आहेत, असे डॉ. सावंत यांनी निदर्शनास आणले. युकेमधून गोव्यात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली असून पॉझिटिव्ह असलेले व त्यांच्या संपर्कात असलेल्यांना क्वारंटाईन केल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
गांजा लागवडीचा निर्णय अंतिम नाही
गांजा लागवड विषय हा केवळ प्रस्ताव असून त्याची फाईल विविध खात्यांच्या टिपणीसाठी फिरत आहे. प्रस्ताव आला, फाईल फिरली म्हणजे निर्णय झाला असे कोणी समजू नये. सध्या त्यावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही आणि तो प्रस्ताव सध्या स्थगित ठेवण्यात आल्याचे डॉ. सावंत म्हणाले. त्यांनी वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
गांजा लागवडीस भाजपचा विरोध : तानावडे
दरम्यान गांजा लागवडीस मान्यता देण्यास भाजपनेही विरोध दर्शविला आहे. तो निर्णय रद्द व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सहमती दर्शविली असल्याचा दावाही तानावडे यांनी केला आहे.









