मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचा इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. जर नागरिकांनी सहकार्य केले नाही तर लॉकडाऊन अनिवार्य आहे. लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी सरकारला योग्यप्रकारे सहकार्य करावे, ओ आवाहन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने येडियुराप्पा यांनी राज्यात लॉकडाऊन जारी करावा का?, याबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सोमवारी बिदर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. बेंगळूरसह राज्यातील अनेक जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला आहे. नागरिकानी स्वतःच्या आरोग्यहित विचारात घेऊन आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. गर्दी करू नये. शारीरिक अंतर राखावे. मास्क वापरावा. सरकार सातत्याने जागृती करत आहे. कोरोना अधिक असलेल्या जिल्हय़ांतील शहरांमध्ये नाईट कर्फ्यु जारी करण्यात आला आहे. त्याला देखील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. अन्यथा सरकारला कठोर कारवाई करावी लागेल. लॉकडाऊन जारी करण्याची अनिवार्य परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही येडियुराप्पा यांनी दिला.
कोरोना नियंत्रणासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. कोरोनाचे अधिक रुग्ण असणाऱया ठिकाणी कठोर नियम जारी करण्यात आले आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी नागरिकांनी जागरुक असावे. फाजिल आत्मविश्वास बाळगू नये. इतर जिल्हय़ांमध्येही रुग्ण वाढल्यास एक आठवडा बघून आणखी कठोर नियम जारी करण्यात येतील, असे ते म्हणाले.
पोटनिवडणुकीनंतर सर्वपक्षीय बैठक?
राज्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून त्यावर नियंत्रण आणण्यासंबंधी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. 17 एप्रिल रोजी राज्यातील तीन ठिकाणी पोटनिवडणूक झाल्यानंतर ही बैठक होणार असल्याचे समजते. बैठकीच्या तारखेबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. बेंगळूरमध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी येथे काही दिवसांचा लॉकडाऊन घोषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.









