वैद्यकीय तज्ञांनी केले देशवासियांना सतर्क – पंतप्रधान आज घेणार ‘ओमिक्रॉन’स्थितीचा आढावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ओमिक्रॉनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. केंद्राने मार्गदर्शक तत्त्वे जारी करून राज्यांना सतर्क केले आहे. ओमिक्रॉन प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असतानाच मेदांता हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान यांनी पुढील 6 ते 8 आठवडे भारतातील लोकांसाठी गंभीर असल्याचा इशारा दिला आहे. मात्र, लोकांनी नियम पाळून दैनंदिन व्यवहार चालू ठेवल्यास कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहू शकेल, असा दावा करतानाच ‘लॉकडाऊन’ची आवश्यकताही भासणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे.
भारतातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या बुधवारी 220 च्या वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात या दोन राज्यांमध्ये सध्या हा आकडा प्रत्येकी 50 च्या वर पोहोचला असून येथे सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात सध्या ओमिक्रॉनबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारकडून संसर्ग नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.
ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता वैद्यकीय तज्ञांनीही लोकांना अलर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊनची गरज नाही, पण लोकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणेही पूर्णपणे टाळणे आवश्यक असून सामाजिक अंतर राखण्याचा प्रयत्न करावा. पुढील 4-6 आठवडे कडकपणे नियम पाळल्यास ओमिक्रॉन विषाणूच्या प्रसाराची गती कमी होईल, असे डॉ. नरेश त्रेहान यांनी म्हटले आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा स्वागतोत्सव गर्दीमुक्त करण्यावर राज्यांनी भर दिला पाहिजे, असे सांगतानाच नाईट कर्फ्यू लागू करणे, नाईट क्लब, बार बंद करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सुचविले.
लस घेण्याबरोबरच नियमही पाळा ः डॉ. गुलेरिया
केंद्राने राज्यांना ओमिक्रॉनच्या विरोधात तयारीबाबत पत्र लिहिल्यानंतर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नवीन इशारा दिला आहे. ‘ओमिक्रॉन हा अधिक संसर्गजन्य प्रकार आहे. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. पहिली लसीकरण करणे आणि दुसरी म्हणजे कोरोना नियमांचे योग्य पालन करणे,’ असे डॉ. गुलेरिया म्हणाले. तसेच ओमिक्रॉनपासून संरक्षण मिळविण्यासाठी विद्यमान लसींमध्ये बदल केले जाऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या लसी प्रभावी आहेत, पण नवीन व्हेरियंट आल्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
होम आयसोलेशनमध्ये बहुतेक रुग्ण तंदुरुस्त
ओमिक्रॉन व्हेरियंटसंबंधी भीती पसरवली जात असली तरी सद्यस्थितीत देशात कोणताही रुग्ण अत्यवस्थ किंवा अतिगंभीर स्थितीत नाही. भारतात नोंदवण्यात आलेल्या ओमिक्रॉन रुग्णांमध्ये बहुतेक परदेशातून आलेल्यांचा समावेश आहे. सर्व प्रकरणे सौम्य आहेत आणि आतापर्यंत कोणतीही मोठी लक्षणे आढळलेली नाहीत. बहुतेक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये बरे होत आहेत. मात्र, होम आयसोलेशनमध्ये संक्रमण होण्याची शक्मयता असल्याने राज्य सरकार ओमिक्रॉनबाधितांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देत आहे.