निपाणी शहरातील परिस्थिती : लसीकरण केंद्राबाहेर गर्दीच गर्दी : सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष : अधिकारी, डॉक्टरांच्या सूचनांकडे कानाडोळा
प्रतिनिधी /निपाणी
निपाणी व शहर परिसरात सध्या कोरोना प्रतिबंधक लस मोहिमेच्या दुसऱया टप्प्याला आता अधिक गती आली आहे. निपाणी शहराची लोकसंख्या जवळपास 80 हजारांपेक्षा अधिक आहे. विविध वॉर्डांमध्ये लसीकरणाच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा पुरविली जात आहे. मात्र नागरिकांकडून सुरक्षिततेच्या नियमांना तिलांजली दिली जात आहे. त्यातून होणारी नियमांची पायमल्ली कोरोनाच्या तिसऱया लाटेला कारण ठरेल, असा अंदाज सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षभरापासून सरकारी रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला लसीकरणा विषयीचे तर्कवितर्क निर्माण झाल्याने लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळाली नाही. पण सध्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दूरवरच्या प्रवासासाठी प्रतिबंधक लस घेतल्याचा अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे आपली गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी लसीकरणाला पसंती दिल्याचे दिसत आहे. आरोग्याविषयी सतर्क राहून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य प्रशासन करत असून नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. त्यानुसार सुरुवातीच्याकाळात नागरिकांनी सतर्क राहून या गोष्टी पाळल्या. मात्र अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेले नागरिक आता नियम तोडत दैनंदिन व्यवहार करत आहेत. त्यामुळे तिसऱया लाटेला पूरक परिस्थिती निर्माण होत आहे. बाजारपेठेतील गर्दी, विविध व्यवहारांमध्ये गाफीलपणा पाहिल्यास आपण अद्यापही असुरक्षित आहोत. असे असले तरी ‘कोरोना विषाणूचा फैलाव हे एक षड्यंत्र’ असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दोन डोसमध्ये अंतर, जबाबदार कोण?
लसीकरण केंद्राच्या बाहेर सुरक्षितता बाळगत लसीकरण करून घेण्याविषयी डॉक्टर व अधिकारी यांच्याकडून सूचना करण्यात येते. मात्र ताळमेळ सोडलेले नागरिक कोणतीही सूचना पाळत नसल्याने, नियम पाळणाऱया लोकांना कोरोना फैलावामुळे बाधा होण्याची शक्मयता निर्माण होत आहे. लसीकरणासाठी सकाळी सहा वाजल्यापासून केंद्राबाहेर नंबर लावला जात आहे. तर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत केंद्राबाहेरील गर्दी सातत्याने वाढतच जात असल्याचे दिसते. पहिला व दुसरा डोस यामधील अंतर वाढवून गर्दी नियंत्रणात आलेली नाही. खासगी दवाखान्यात 780 रुपयाला लस उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र गरीब लाभार्थ्यांना विकतची लस घेणे परवडणारे नसल्याने सरकारी केंद्रात बाहेर गर्दीचा महापूर दिसतो आहे. सुरक्षित लसीकरणही आरोग्यासाठी घातक गोष्ट आता बनत चालली आहे.
कोरोना खरचं आहे का?
केंद्राबाहेर वाढणारी गर्दी, असुरक्षित व्यवहार, नागरिकांमधील सुरळीत दैनंदिन व्यवहार पाहता कोरोनाची भीती आता नाहीशी होत चालली आहे. सध्याचे वातावरण पाहून अनेक नागरिकांनी अद्यापही लसीकरणाचा विचारही मनात आणलेला नाही. स्थानिक पातळीवर सर्वकाही सुरळीत चाललेले व्यवहार पाहून अनेक नागरिकांच्या मनात कोरोना खरचं आहे का?, असा सवाल निर्माण होत आहे. या प्रश्नाचे उत्तर त्यांना कोण देणार?, याची चर्चा लसीकरण केंद्राबाहेर सुरू आहे.
सर्व लाटांचे झाले बाजारीकरण?
कोरोनाची पहिली व दुसरी लाट अनुभवलेल्या नागरिकांना या विषाणूची भीती निर्माण झाली आहे. आता तिसरी लाट येण्याचा धोका संशोधकांनी व्यक्त केला आहे. या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा तालुका व ग्रामप्रशासन प्रयत्न करत असून प्रतिबंधक लस औषधे व उपचार या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक झाल्याचा आरोप केला जात आहे. व्याधी व रोग याचे निदान लागण्याआधी विविध चाचण्या व लसीकरणाच्या माध्यमातून रुग्णांची फसवणूक झाली आहे. यापुढील विविध लाटांच्या माध्यमातून आर्थिक बाजार सक्षम करण्यासाठी एक षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप निपाणी शहरवासीयांच्यावतीने केला जात आहे.









