केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयातील संयुक्त बैठकीत निर्देश
वार्ताहर / केपे
कावरे-केपे येथून चालू असलेली खनिज वाहतूक नियमांचे पालन करून होत नसल्याचा दावा करून ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर केले होते. यासंबंधी बुधवारी केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी, कावरे ग्रामस्थ, केपेचे नागरिक, केपे पोलीस निरीक्षक, वाहतूक निरीक्षक, खाण कंपनी अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बंद असलेला खाण व्यवसाय अजूनही सुरू झाला नसला, तरी गेल्या काही दिवसांपासून खनिजमाल नेण्याची परवानगी मिळाल्याने खनिज वाहतूक व्यवसायात असलेल्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र ही खनिजमाल वाहतूक करताना अनेक नियमांचे पालन करायला हवे. खनिज वाहतुकीमुळे रस्त्यावर साठणारी धूळ वेळोवेळी काढायला हवी किंवा त्यावर पाणी फवारायला हवे. अंतर ठेऊन ट्रक सोडायला हवेत. अशा अनेक नियमांचे पालन होत नसल्याने याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे, याकडे कावरे ग्रामस्थांनी निवेदन सादर करून लक्ष वेधले होते. कावरे या भागातून केपे, तिळामळमार्गे खनिजमाल वाहतूक कुडचडेपर्यंत जात असते.
वरील बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. खाण ते केपे पालिका भाग, तिळामळपर्यंतच्या रस्त्यावर साठणाऱया धुळीवर पाणी फवारणे, अंतर ठेऊन ट्रक सोडणे व इतर नियमांचे पालन करण्यात यावे, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या बाजू माडल्या. केपेचे नागरिक शेख आझीम यांनी सागितले की, कावरे भागातून जी खनिज वाहतूक होते ती केपे बाजारातून जात असल्याने केपे बाजारातही धुळीचा त्रास होतो. यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली व खाणीपासून केपे बाजार, तिळामळपर्यंतच्या रस्त्यावर साठणाऱया धुळीवर पाणी फवारावे तसेच नियमांचे पालन करत अंतर ठेऊन खनिजवाहू ट्रक सोडावेत असे उपजिल्हाधिकाऱयांनी उपस्थित खाण कंपनी अधिकाऱयांना सांगितले.









