सीडीएस रावत यांचा इशारा : चीनशी संघर्ष करण्याचीही तयारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाख सीमेवरील स्थितीसंदर्भात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. नियंत्रण रेषेसंदर्भात कोणताही बदल भारताला मान्य नसल्याचे सीडीएस बिपिन रावत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच परिस्थिती हाताबाहेर जाऊन मोठा संघर्ष सुद्धा होऊ शकतो, असा त्यांनी इशारा दिला. भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी कमांडर्समध्ये शुक्रवारी आठव्या फेरीची चर्चा सुरू होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
चीनशी असलेला सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने वारंवार चर्चा केली जात आहे. वेगवेगळय़ा पातळीवरील अधिकारी चर्चेत सहभागी होत असतात. दोन्ही देशांमधील एकूण सुरक्षा स्थिती लक्षात घेतली तर चीनसमवेत मोठे युद्ध होण्याची शक्मयता कमी आहे. पण सीमेवरील संघर्ष, घुसखोरी आणि चिथावणीखोर लष्करी कृतीमुळे एक मोठा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जनरल रावत म्हणाले. नवी दिल्लीतल नॅशनल डिफेन्सच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पूर्व लडाख सीमेवर तणावाची स्थिती कायम आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे दुस्साहस करणाऱया चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागतेय, असे रावत म्हणाले. मे महिन्यापासून सुरू झालेली ही संघर्षाची स्थिती अजूनही कायम आहे. आमची तैनाती एकदम स्पष्ट आहे. भारतीय सैन्य नियंत्रण रेषेच्या पलिकडे गेलेले नाही. चीन मात्र वेळोवेळी नियंत्रण रेषेत फेरबदल करण्याच्या पवित्र्यात दिसून येतो. तरीही नियंत्रण रेषेमध्ये कुठलाही बदल आम्ही मान्य करणार नाही, असे रावत यांनी सांगितले. तसेच चीनकडून पाकिस्तानला मिळणाऱया पाठबळाचा उल्लेखही रावत यांनी केला. भारतासमोर चीन आणि पाकिस्तान दोघांचे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्चेची आठवी फेरी
भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱयांमध्ये आतापर्यंत सात फेऱयांची चर्चा झाली आहे. पण अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही. दोन फेऱयांच्या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. आता आठव्या फेरीतील चर्चा पूर्व लडाखमधील चुशूल येथे सुरू झाली आहे. कमांडर पातळीवरील या चर्चेकडे दोन्ही देशांचे लक्ष लागलेले आहे. मात्र, या चर्चेतील फलनिष्पत्ती पूर्णपणे उलगडण्यात आलेली नाही.









