प्रतिनिधी/ सातारा
Rसत्ताबदलापासून राजकिय घडामोडी पहाता कोण कुठे आहे?, कोणाला भेटते याचा नियम नाही. कोणाचे कोण विरोधक हेही समजत नाही. अशीच एक भेट सोमवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे झाली. राज्य उत्पादन शुल्कमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या भेटीला चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार, भाजपचे आमदार यांच्या उपस्थितीने राजकीय चर्चा सुरू झाली. ही भेट कराडमध्ये होत असलेल्या शिवपुत्र संभाजी महानाटय़ाच्या निमंत्रणासाठी असली तरी या भेटीमुळे डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांना यानिमित्ताने पुन्हा एकदा उधाण आले आहे.
सातारा जिह्याच्या दौऱयावर केंद्रीय मंत्री भागवत कराड असल्याने नियोजित बैठका सुरू होत्या. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दौरा लागल्याने बहुतांशी अधिकारी हे त्यांच्या दौऱयावर गेले तर नियोजन भवनात बैठकीला इतर अधिकारी व इतर लोकप्रतिनिधी यांची हजेरी होती. त्या बैठकीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई हे शासकीय विश्रामगृह येथे पोहोचले. तेथे आधीच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे थांबले होते. त्यांनी पालकमंत्री देसाई यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण आणि आमदार अनिल बाबर यांची उपस्थिती होती.
कराड येथे होत असलेल्या शिवपुत्र संभाजी महानाटय़ाचे निमंत्रण देण्यासाठी खासदार अमोल कोल्हे साताऱयात आले होते. थ्यावेळी त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेतली. व यावेळी त्यांनी महानाटय़ाबाबतची माहिती उपस्थितांना सांगितली. या भेटीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई व आमदार जयकुमार गोरे यांची कमराबंद चर्चा झाली. य्ािंत काय चर्चा याबद्दल माहिती मिळाली नाही. या घडामोडीत भाजपशी जवळीक वाढत असलेल्या खासदार अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार काय? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात सुरू आहेत.








