प्रतिनिधी/ निपाणी
भाषिक प्रांतरचनेवेळी अन्यायाने कर्नाटकात डांबल्याचा निषेध करत दरवर्षी 1 नोव्हेंबर हा सीमावासीय मराठी भाषिकांतर्फे काळादिन म्हणून पाळला जातो. त्यानुसार रविवारी निपाणीत काळादिन गांभीर्याने पाळण्यात आला. यावेळी केलेल्या निपाणी बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शहर व उपनगरात व्यापाऱयांनी दुपारपर्यंत आपले व्यवहार बंद ठेवून आपली अस्मिता दाखवून दिली.
रविवार सकाळपासूनच शहरात शुकशुकाट दिसून येत होता. येथील संभाजीराजे चौक, जुना पी. बी. रोड, मुरगूड रोड, चिकोडी रोड, बेळगाव नाका, चाटे मार्केट, चन्नम्मा सर्कल, नेहरु चौक आदी भागात बहुतांशी व्यवहार ठप्प होते. यंदा काळय़ादिनी मूकफेरी तसेच सभेला परवानगी मागूनही प्रशासनाने आडमुठी भूमिका घेत परवानगी नाकारल्याने त्याचाही मराठी भाषिकांनी निषेध नोंदवला. यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे व्यापारीवर्गाला मोठा फटका बसल्याने तसेच दिवाळीच्या तोंडावर अधिक नुकसान होऊ नये यासाठी दुपारनंतर शहरातील काही व्यवहार सुरळीत सुरू झाले.
कर्नाटकी प्रशासनाने सभेस परवानगी नाकारल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांच्या निवासस्थानी मराठी भाषिकांची बैठक पार पडली. यावेळी बोलताना खांबे म्हणाले, निपाणीत मराठी भाषिक व व्यापाऱयांनी कर्नाटक शासनाचा निषेध करत जो बंद पाळला त्याचे स्वागत करतो. तसेच महाराष्ट्रातील मंत्र्यांनीही काळादिन म्हणून रविवारी काळय़ा फिती लावून कामकाज केले त्याचेही आभार मानतो. समितीच्या पाठीशी शिवसेना नेहमीच खंबीरपणे उभी आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मराठी भाषिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्याही मतदारसंघात मराठी भाषिक मोठय़ा प्रमाणात आहेत. याची जाण त्यांनी ठेवावी, असे सांगितले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे जयराम मिरजकर म्हणाले, केंद्राच्या अन्यायामुळे सीमाभागातील मराठी भाषिक जनता खितपत पडली आहे. केंद्र व कर्नाटक सरकारने सीमालढा कितीही मोडून काढायचा प्रयत्न केला तरी आम्ही लढय़ावर ठाम आहोत. स्थानिक प्रशासनाने बोटचेपी भूमिका घेऊन मूकफेरीला परवानगी नाकारली याचा निषेध करतो. आगामी काळात व्यापक शिष्टमंडळ घेऊन सीमा समन्वयक मंत्री छगन भुजबळ व एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी निवेदन देणार आहोत, असे सांगितले.
याप्रसंगी रमेश निकम, पिंटू सूर्यवंशी, बी. टी. तराळ, बाळू हजारे, किरण पावले यांच्यासह मराठी भाषिक उपस्थित होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









