निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यास तसेच मास्कचा वापर दैनंदिन जीवनाचा भाग बनावा, यासाठी विनामास्क वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. निपाणीत या कारवाईतून गेल्या 15 दिवसांत सुमारे दोन लाखांचा दंड वसूल झाला आहे. यापैकी पालिका प्रशासनाने लाखापर्यंत तर उर्वरित दंड पोलीस प्रशासनाने वसूल केला आहे. सदर कारवाई सुरूच असून यातून वाहनधारक तसेच नागरिकांमध्ये मास्कच्या वापराबाबत जागरुकता निर्माण झाल्याचे दिसत आहे. अनलॉक नियमावली जाहीर केल्यानंतर सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन होऊन संसर्गही वाढत होता. त्यामुळे विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
सोमवारी देखील निपाणीत संभाजीराजे चौक, नगर पालिका, बेळगाव नाका, कोठीवाले कॉर्नर, अकोळक्रॉस याठिकाणी थांबून मास्क न वापरणाऱया वाहनधारक व नागरिकांना प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला.
सदर दंडात्मक कारवाईतून प्रशासनाला महसूल मिळत आहे. त्याबरोबरच नागरिकांमध्येही जागृती निर्माण झाली आहे. 15 दिवसांपूर्वी दंडात्मक कारवाईतून दररोज 10 ते 15 हजार रुपये इतकी वसुली होत होती. मात्र आता दिवसभर कारवाईतून केवळ 3 ते 4 हजार रुपये दंड वसूल होत आहे. वाहनधारक व नागरिकांनी मास्कचा वापर वाढविल्याने पालिका कर्मचाऱयांनीही समाधान व्यक्त केले.









