वार्ताहर/ निपाणी
जत्राटसह परिसरात सध्या ऊस तोडणी, तंबाखू कापणी, भरणीची कामे गतीने सुरू आहेत. अशा परिस्थितीत शुक्रवारी या परिसरात गव्यांच्या कळपाने धुडगूस घातला. यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरीवर्गात यातून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
गव्यांचा वावर शुक्रवारी प्रथम यमगर्णी येथे वेदगंगा नदी परिसरात दिसून आला. तीन गव्यांचा हा कळप पाहून शेतकऱयांची पाचावर धारण बसली. काही शेतकऱयांनी धाडसाने हुसकावून लावताना गव्यांना पिटाळले. यानंतर हे गवे जत्राटच्या दिशेने गेले. जत्राट व नांगनूर परिसरात शेती पिकांचे नुकसान केले. याठिकाणीही शेतकऱयांनी गव्यांना हुसकलून लावल्याने ते गवे ओढय़ाच्या मार्गाने लखनापूरकडे गेले.
सध्या शेतीकामांची धांदल सुरू आहे. चाऱयासाठी पशूपालक ऊसतोड सुरू असेल त्याठिकाणी धाव घेत आहेत. अशा परिस्थितीत गव्यांचा वावर सुरू झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उसाला पाणी देण्यासाठी शेतकऱयांना रात्रीच्यावेळी शेतशिवार गाठावे लागते. यामध्ये गव्यांचा हल्ला होण्याचीही भीती व्यक्त होत असून वन विभागाने त्वरित या गव्यांना पकडण्याची कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, हे गवे राधानगरी जंगल परिसरातून दूधगंगा नदीच्या काठाने या भागात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे.









