प्रतिनिधी/ निपाणी
कोल्हापूर, इचलकरंजी आणि संकेश्वर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तसेच बाहेरील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा काहीकाळ निपाणीत संपर्क आल्याने येथील 11 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याबरोबरच नागरिकांना खरेदीसाठी सकाळी 7 ते 10 पर्यंतच्या देण्यात आलेल्या सवलतीमुळे सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. याची दखल घेत खबरदारी म्हणून दिलेली सवलत रद्द करताना निपाणी उद्या गुरुवारपासून सीलडाऊन करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या कै. विश्वासराव शिंदे सभागृहात घेण्यात आलेल्या प्रशासनातील अधिकाऱयांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व सीपीआय संतोष सत्यनायक, पालिका आयुक्त महावीर बोरण्णावर यांच्या उपस्थितीत निपाणीतील किराणा दुकानदारांची बैठक घेण्यात आली. यावेळी सीपीआय संतोष सत्यनायक म्हणाले, लॉकडाऊन काळात निपाणीतील नागरिकांना त्रासाचे ठरु नये, यासाठी प्रशासनाकडून सकाळी 7 ते 10 या वेळेत किराणा खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. मात्र या काळात नागरिकांकडून तसेच दुकानदारांकडून सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले नसल्याचे दिसून आले. शिवाय नजीकच्या संकेश्वर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहर सीलडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे संकेश्वरनजीकच्या गावातील नागरिकदेखील खरेदीसाठी निपाणीत येत आहेत. त्यामुळे शहरात गर्दी होत असून नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे गुरुवारपासून शहरातील खरेदीची सवलत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस शहर पोलीस ठाण्याचे फौजदार कुमार हडकर, बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे फौजदार बी. जी. सुब्बापूरमठ, पालिका व्यवस्थापक विनायक माने, स्वच्छता निरीक्षक स्वानंद तोडकर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
ऑनलाईन ऑर्डर द्यावी
पालिका आयुक्त महावीर बोरण्णावर म्हणाले, निपाणीतील नागरिकांनी किराणा मालाच्या खरेदीसाठी दुकानदारांना ऑनलाईन ऑडर द्यावी. दुकानदारांकडून सदर साहित्य घरपोच आणून दिले जाईल. यासाठी ऍप विकसीत करण्यात आले असून, या ऍपशिवाय नागरिक दुकानदारांना व्हॉट्सऍप तसेच फोनवरुनदेखील ऑर्डर देऊ शकतील. कोणत्याही परिस्थितीत गुरुवारपासून नागरिकांनी घराबाहेर येऊ नये.
रस्त्यावर दिसल्यास कारवाई
सीपीआय संतोष सत्यनायक म्हणाले, गुरुवारपासून सकाळी 7 ते 10 ची सूट पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारण वगळता खरेदी अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी नागरिक रस्त्यावर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. दुचाकी अथवा चारचाकी वाहनातूनदेखील या काळात विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसल्यास वाहन जप्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निपाणीतील लॉज प्रशासनाच्या ताब्यात
रविवारी कोल्हापूर येथील सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा निपाणीतील काही व्यक्तींशी संपर्क आला होता. त्यामुळे निपाणीतील 11 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. येणाऱया काळात आणखी काहींना क्वारंटाईन करावयाचे झाले तर खबरदारी म्हणून निपाणीतील लॉज ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमण्णहळ्ळी यांनी दिले आहेत. त्यानुसार तालुका प्रशासनाने शहर व्याप्तीतील लॉज मालकांची बैठक घेऊन सदर लॉज प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात येत असल्याचे सांगितले.
क्वारंटाईन म्हणजे रुग्ण नव्हे
अनेकदा क्वारंटाईन व्यक्तींना लॉजमध्ये ठेवण्यास विरोध होतो. मात्र क्वारंटाईन म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण नव्हे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारी म्हणून काही काळासाठी विलगीकरण केले जाते. त्यांच्यावर आरोग्य खाते लक्ष ठेवून असते. त्यामुळे लॉजमालक व परिसरातील जनतेने प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार प्रकाश गायकवाड व सीपीआय संतोष सत्यनायक यांनी केले.









