निपाणीतील प्रकार : वाईनशॉपमध्ये चोरी, चोरटा सीसीटीव्हीत कैद
प्रतिनिधी/ निपाणी
येथील बडमंजी प्लॉटमधील असणाऱया अंबाबाई मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे दहा हजारहून अधिक रुपये लांबविल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याशिवाय बसस्थानक परिसरातील लक्ष्मी वाईनशॉपमध्येही चोरीची घटना घडली आहे. मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला आहे. त्याच्या आधारे चोरटय़ाचा शोध घेण्यात येत आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, बडमंजी प्लॉटमधील अंबाबाई मंदिरात असणारी दानपेटी चोरटय़ाने लांबविल्यानंतर ती व्यायाम शाळेच्या मागील बाजूस नेऊन फोडली. तेथून दानपेटीतील रक्कम घेऊन ती पेटी तिथेच सोडून चोरटय़ाने पलायन केले. सदर चोरटा मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये आढळून आला आहे. ही घटना मंदिराच्या पुजाऱयाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती निपाणी शहर पोलीस स्थानकाला दिली. घटनास्थळी शहर फौजदार अनिलकुमार कुंभार, उदय कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर निपाणी बसस्थानक परिसरातील लक्ष्मी वाईन्स येथेही चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरटे सक्रीय तर पोलीस निष्क्रिय?
लॉकडाऊननंतर निपाणी शहरासह परिसरात चोरींच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून शहर परिसरातील बंद घरे, मंदिर यांना चोरटय़ांनी लक्ष्य केल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. शहरात चोरटे सक्रीय तर पोलीस निष्क्रिय झाल्याची चर्चा रंगली आहे.









