सुदैवाने चालकासह दाम्पत्य बचावले
प्रतिनिधी/ निपाणी
कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरून जवळपास 20 फूट खाली येऊन सेवा रस्त्यावर उलटली. या दुर्घटनेत कारचा चक्काचू झाला असून कारमधील दाम्पत्य सुदैवाने बचावले. सदर अपघात निपाणीनजीक शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास झाला. कार (केए 22 एमए 7979) ही बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. दरम्यान निपाणी महामार्गनजीक हॉटेल न्यू प्रार्थनाजवळ आली असता चालक शिवानंद सुतकट्टी याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरून खाली जात सेवा रस्त्यावर उलटली. बेळगाव येथील कमल भंडारी व मधू भंडारी हे वृद्ध दाम्पत्य कार मध्ये अडकून पडले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र इंगवले, जय सांगावकर, उत्तम सांगावकर तसेच परिसरातील नागरिकांनी या वृद्ध दाम्पत्यास कसरत करुन कारमधून बाहेर काढले. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून चालक आणि दाम्पत्य सुदैवाने बचावले. या अपघाताची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस स्थानकाचे एएसआय बी. एस. पुजारी, हवालदार दळवार, तसेच पीएसआय कृष्णवेणी गुर्लहोसुर यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर भंडारी दाम्पत्य विवाह समारंभानिमित्त कोल्हापूरला निघाले असता हा अपघात झाला.









