वार्ताहर/ निपाणी
राज्यात पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण सेवा देण्यासाठी 15 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. सदर परीक्षा शनिवार 21 रोजी सुरू झाली असून रविवार दि. 22 रोजी संपणार आहे. दोन दिवसांच्या परीक्षेसाठी राज्यातील विविध विभागातून परीक्षार्थी दाखल झाले आहेत. निपाणी शैक्षणिक तालुक्मयातील 10 केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जात आहेत. शनिवारी या परीक्षेस सुरळीतपणे प्रारंभ झाला.
गेल्या 4 दिवसांपासून निपाणी तालुक्मयात या परीक्षेची तयारी सुरू होती. अनेक परीक्षार्थी आपला परीक्षा क्रमांक कोणत्या केंद्रावर आहे, हे तपासून घेण्यासाठी धावपळ करत होते. अशा या परिस्थितीत राज्यातील विविध विभागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी शहर व परिसरातील लॉज, संस्कृती कार्यालये या ठिकाणी आपली निवासाची सोय करून घेतली. पण अनेकांना ही सोय करताना बरीच धावपळ करावी लागल्याने त्यांची गैरसोय झाली. अनेक परीक्षार्थींनी महाराष्ट्र राज्यातील नजीकच्या शहरात निवासाची सोय करून परीक्षा केंद्र गाठण्यापर्यंतची सोय उपलब्ध करून घेतली.
शनिवारी परीक्षेचा पहिला दिवस असल्याने परीक्षा केंद्रांबाहेर परीक्षार्थींनी सकाळी 7 वाजल्यापासून हजेरी लावली होती. 9 वाजता परीक्षा केंद्रांबाहेर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. वाहनांचे पार्किंग करून परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश करताना काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी आवश्यक ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. रविवारी ही परीक्षा संपणार असून परीक्षार्थींचे शिक्षक होण्याचे स्वप्न पेपर बंद होणार आहे.
चिकोडी विभागात 11,200 परीक्षार्थींची व्यवस्था
शनिवारी दोन सत्रात परीक्षा पार पडली. सकाळच्या सत्रात चिकोडी विभागात 12948 परीक्षार्थींची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातील पहिल्या सत्रात पार पडलेल्या परीक्षेसाठी 11200 परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र 7124 उमेदवारांनी हजेरी लावली होती. तर 4076 उमेदवार गैरहजर राहिले होते. दुसऱया सत्रात पार पडलेल्या परीक्षेसाठी 1748 परीक्षार्थींची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र 1149 जणांनी पेपर दिला तर 599 जण गैरहजर राहिले होते.









