गांजा विक्रीप्रकरणी महिला ताब्यात : दोन किलो गांजा जप्त
प्रतिनिधी/ निपाणी
महाविद्यालयीन युवकांसह ग्राहकांना शोधून त्यांना गांजाविक्री करणाऱया महिलेस रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना निपाणी बसस्थानकात बुधवारी सकाळी घडली. जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. या कारवाईने शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मावा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. आता गांजाविक्रीही उघडकीस आल्याने निपाणीसह शहरात अवैधधंदे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सदर महिला गेल्या काही दिवसांपासून निपाणी बसस्थानक तसेच महाविद्यालय परिसरात गांजाविक्री करत असल्याची माहिती खबऱयांकडून डीसीआयबीच्या पथकास मिळाली. त्यानुसार बुधवारी सकाळी पाळत ठेवून बसस्थानक आवारात सदर महिलेस गांजाविक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर सदर महिलेवर येथील बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
शहरात अवैध व्यवसाय फोफावले
दरम्यान तीन दिवसापूर्वी शहरात अनधिकृतरित्या मावाविक्री करणाऱया तीन पानशॉप चालकांवर नगरपालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली होती. आरोग्यास घातक असणाऱया माव्याच्या उत्पादन व विक्रीस बंदी असतानाही निपाणीत सर्रास या माव्याची विक्री होत होती. मात्र सोमवारी झालेल्या या कारवाईने शहरातील अनेक पानशॉपचालकांचे धाबे दणाणले होते. या माव्यानंतर आता गांजाविक्रीवरही कारवाई झाल्याने निपाणीत होणारे अवैधधंदे उघडकीस आले आहेत. सदर कारवाई डीसीआयबी पथकाने केली. त्यामुळे युवा वर्गाला व्यसनाधिन बनविणाऱया या गंभीर बाबीकडे शहरातील पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.








