प्रतिनिधी/ निपाणी
येथील बसस्थानक परिसरातील जुना पी बी रोडनजिक असलेल्या फूटपाथवर गेल्या अनेक महिन्यापासून अतिक्रमणाने ठाण मांडले होते. यासंदर्भात अनेकदा तक्रारी होऊन देखील याकडे दुर्लक्ष झाले होते. अखेर बुधवारी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने फुटपाथवर झालेले अतिक्रमण हटवण्यात आले. तसेच पुन्हा आक्रमण झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
जुना पी बी रोडनजिक नव्याने पेव्हरब्लॉक बसवून आकर्षक अशी फुटपाथ निर्मिती करण्यात आली. मात्र त्यानंतरही येथे व्यवसायिकांनी विविध प्रकारे अतिक्रमण केले होते. हातगाडे, दुकानांचे फलक, शेड आदीच्या माध्यमातून बहुतांशी फूटपाथ एकप्रकारे काबीज करण्यात आले आहेत. त्यामुळे पादचाऱयांना तसेच वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला होता. अशावेळी सदर फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी नागरिकांतून होत होती.
त्यानुसार बुधवारी सकाळी बसस्थानक परिसरात जुना पी बी रोडवरील फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणाची पाहणी पालिका आयुक्त महावीर बोरण्णावर, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार हडकर यांनी केली. त्यानुसार अतिक्रमण केलेल्या व्यापाऱयांना तात्काळ अतिक्रमण हटवण्यास सांगितले. यावेळी व्यापारी तसेच अधिकाऱयांमध्ये वादावादी झाली. मात्र कोणत्याही परिस्थितीत फुटपाथवर अतिक्रमण झाल्यास यापुढेही कठोर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर ठिकठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आले. असे असले तरी सदर कारवाईमध्ये सातत्य राहणार का? हा मोठा प्रश्न आहे.









