सकाळच्या सत्रात दुकाने बंद ठेवून निषेध : अनेक व्यावसायिकांनी काळय़ा फिती लावून केले व्यवहार
प्रतिनिधी /निपाणी
गेली 65 वर्षे लोकशाही मार्गाने सुरू असलेला सर्वात मोठा लढा म्हणून सीमाप्रश्न ओळखला जातो. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह असलेला सीमाभाग मुंबई प्रांतातून तत्कालीन म्हैसूर प्रांतात अन्यायाने डांबण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात मराठी भाषिकांतर्फे काळा दिन म्हणून पाळला जातो. त्याप्रमाणे सोमवारीही काळा दिन गांभीर्याने पाळण्यात आला.
भाषिक अस्मितेचा लढा जिवंत ठेवण्यासाठी निपाणी शहर व उपनगरात दरवषी 1 नोव्हेंबर कडकडीत बंद पाळण्यात येतो. त्याप्रमाणे सर्व व्यवहार ठप्प असतात. यंदा गेली दोन वर्षे कोरोना व लॉकडाऊनमध्ये व्यापारी वर्गासाठी फटका बसला आहे. परिणामी निपाणीत सोमवारी केवळ सकाळच्या सत्रात बंद पाळण्यात आला. यानंतर अनेक व्यावसायिकांनी काळय़ा फिती लावून आपले व्यवहार सुरू ठेवले.
प्रशासनाकडून गळचेपीचा प्रयत्न
दरम्यान, नेहमीप्रमाणे मराठी भाषिकांच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न कानडी प्रशासनाने केला. काळय़ा दिनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस शहर व उपनगरात स्पीकरद्वारे राज्योत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे जयराम मिरजकर व शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांना आधी दोन दिवस नोटीस देण्यात आली. त्यामध्ये काळय़ा दिनासंदर्भात कोणतीही पत्रके वाटण्यासही बंदी घालण्यात आली होती. तसेच शहर व उपनगरात बंद असलेल्या दुकानांवरही लक्ष ठेवले जात होते.
महाराष्ट्रात जाईपर्यंत काळा दिन पाळणारच
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे म्हणाले, सीमाभागात काळा दिन होऊ नये म्हणून प्रशासन अनेकप्रकारे मुस्कटदाबी करत आहे. मात्र हा अस्मितेचा प्रश्न असून बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभाग महाराष्ट्रात जाईपर्यंत काळा दिन पाळणारच आहोत. स्थानिक नेत्यांनी मराठीच्या बाबतीत सोयीची भूमिका घेतली असली तरी आम्ही मात्र मराठी अस्मितेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे सांगितले.









