प्रतिनिधी / निपाणी
लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सुमारे 7 महिने देशातील सिनेमागृहे बंद ठेवण्यात आली. मात्र आता अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये सिनेमागृहे खुले करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सिनेमागृह खुले करण्यास सुरुवात होत असून उद्या गुरुवारपासून निपाणी येथील राजश्री चित्रपट मंदिरदेखील सुरू होत असल्याची माहिती राजकुमार सावंत यांनी दिली.
सिनेमागृह सुरू होत असली तरी शासनाने यासाठी नियमावली घालून दिली आहे. चित्रपटगृहाच्या एकूण क्षमतेपेक्षा 50 टक्के प्रेक्षकांना प्रत्येक खेळासाठी प्रवेश देण्यात येणार असून, आत प्रवेश करताना प्रत्येकाला मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. शिवाय परिवार सोबत असला तरी रांगेमध्ये प्रत्येकाने एक खुर्ची सोडून बसण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय चित्रपटगृहात खुल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करीत सिनेमागृह सुरू होत असल्याने मनोरंजनासाठी वाट पाहत असलेल्या पेक्षक वर्गासाठी ही एक दिलासा देणारी बातमी ठरली आहे.









