एक हजार स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबियांना अन्न-धान्य पुरविण्याचे उद्दिष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढय़ासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक स्थलांतरित मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा मजुरांसाठी निधी जमा करण्याकरिता भारतीय महिला हॉकी संघाने शुक्रवारी गमतीदार फिटनेस चॅलेंज उपक्रमाला सुरुवात केली आहे.
18 दिवसांचे हे फिटनेस चॅलेंज असून किमान एक हजार कुटुंबियांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी जनतेकडून निधी जमा केला जाणार आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या काळात सतत कार्यरत राहण्यासाठी लोकांना त्या प्रोत्साहितही करणार आहेत. ‘देशभरात अनेकांना विशेषतः स्थलांरित मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांना अन्नासाठी हाल सोसावे लागत असल्याच्या बातम्या रोजच वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर वाचायला मिळताहेत. त्यामुळे अशा लोकांना मदत करण्याच्या निर्णय आम्ही घेतला आणि हा उपक्रम सुरू केला आहे,’ असे भारतीय संघाची कर्णधार रानी रामपाल म्हणाली. ‘ऑनलाईन फिटनेस चॅलेंज हा यासाठी उत्तम मार्ग असल्याचे आम्हाला वाटले आणि या प्रकारे त्यांना लॉकडाऊनच्या काळात कार्यमग्न राहण्याचाही आम्ही आग्रह करणार आहोत. या द्वारे आम्हाला किमान एक हजार कुटुंबियांच्या भोजनाची व्यवस्था करता येईल, इतका निधी जमा करायचा आहे,’ असेही तिने सांगितले.
जनतेकडून जमा केलेला हा निधी दिल्लीस्थित निमसरकारी संस्था उदय फौंडेशनकडे सुपूर्द करणार आहोत. या निधीचा उपयोग ते विविध ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या, स्थलांतरित मजुरांच्या आणि झोपडपट्टीवासियांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी करणार आहेत. अन्न तसेच धान्याबरोबरच सॅनिटरी किट्सही या निधीतून देण्यात येणार आहे. त्यात साबण व सॅनिटायजर्सचा समावेश असेल. याशिवाय या चॅलेंजमध्ये महिला हॉकीपटू बर्पीज, लंजेस, स्क्वाट्स (सूर्यनमस्कारातील कृती), स्पायडरमॅन पुशअप्स, पोगो हॉप्स (लंगडीचा प्रकार) व अन्य कसरती करताना दिसणार आहेत. प्रत्येक दिवशी एका खेळाडूला नवे चॅलेंज देण्यात येईल आणि तिला आपल्या सोशल मीडिया हँडलवर दहा जणांना हे चॅलेंज द्यावे लागेल. तसेच प्रत्येकी 100 रुपये देणगीही त्यांच्याकडून निधीसाठी जमा करावी लागेल.
‘प्रत्येक दिवशी आम्ही एक नवे गमतीदार चॅलेंज देणार आहोत, जे कोणालाही करता येण्यासारखे असेल. जे लोक हे चॅलेंज स्वीकारतील त्यांना 100 रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम त्या खेळाडूकडे देणगी म्हणून द्यावे लागतील. या कार्यासाठी आम्हाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला आशा वाटते,’ असे उपकर्णधार सविता म्हणाली. ‘आपल्या संघातील सर्वच खेळाडू नाजूक आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातूनच इथवर आलो आहोत. आम्हीही अन्नासाठी व इतर प्राथमिक गरजांसाठी संघर्ष केलेला असल्याने सध्या मजुंरांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याची आम्हालाही जाणीव आहे. पण आता आमची परिस्थिती सुधारली असल्याने आम्ही गरीब व गरजूंना मदत करू शकतो. सध्या स्वच्छतेची खूप गरज असल्याने सॅनिटायर्स, साबण तसेच धान्याचा पुरवठा त्यांना व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत,’ असेही ती म्हणाली. मी जर हॉकीपटू झाले नसते तर आमच्या कुटुंबियांचीही अशीच स्थिती झाली असती, असे काही दिवसांपूर्वी वडिलांनी म्हटल्याचे कर्णधार रानी रामपालने यावेळी सांगितले. तिचे वडील हरियाणातील शाहबाद मरकंदा येथे कार्ट पुलरचे काम करीत होते.









