सोमवारी किंवा गुरुवारी शपथ सोहळय़ाची तयारी
पटना / वृत्तसंस्था
सत्ता राखल्यानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता बिहारमध्ये नवे सरकार स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. सरकार स्थापनेची प्रक्रिया दिवाळीनंतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार हेच सांभाळतील, असेही सूचित होत आहे. येत्या सोमवारी किंवा गुरुवारी राज्यात शपथविधी सोहळा पार पडेल, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली. सलग चौथ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद सांभाळण्यास नितीश सज्ज झाल्याचे सूचित होत आहे. नव्या कार्यकाळामुळे बिहारचे मुख्यमंत्रिपद सर्वांधिक काळ भुषवण्याचा मान त्यांना मिळू शकेल.
बिहारची सत्ता मिळवण्यासाठी रालोआ आणि विरोधकांच्या महाआघाडीत अतिशय अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये काठावरचे बहुमत मिळवणाऱया रालोआची सरशी झाली. राज्यातील 243 पैकी 125 जागा रालोआने जिंकल्या. तर विरोधकांच्या महाआघाडीला 110 जागा मिळाल्या. रालोआने सत्ता आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवले असले तरी संख्याबळामुळे त्या आघाडीतील समीकरणे बदलली आहेत. भाजपने 74 जागा जिंकून नितीशकुमार यांच्या संजदला (43 जागा) खूप मागे टाकले. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा सांगू शकतो, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, मुख्यमंत्रिपदी नितीश हेच असतील, अशी स्पष्ट ग्वाही भाजपकडून देण्यात आली आहे.